अंबाबाईची आज नगरप्रदक्षिणा
By admin | Published: October 2, 2014 12:26 AM2014-10-02T00:26:22+5:302014-10-02T00:27:01+5:30
जागराची लगबग : मध्यरात्री होणार जागराची पूजा
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवातला मुख्य दिवस असलेल्या अष्टमीला उद्या, गुरुवारी करवीरनिवासिनी अंबाबाईची नगरप्रदक्षिणा निघणार आहे. रात्री साडेनऊ वाजता तोफेच्या सलामीनंतर देवीची उत्सवमूर्ती वाहनात विराजमान होऊन नगरवासीयांच्या भेटीला निघेल. रात्री बारा वाजल्यानंतर अष्टमीच्या जागर महापूजेला प्रारंभ होईल.
अष्टमीदिवशी करवीरनिवासिनी अंबाबाई नगरप्रदक्षिणेला निघते. चैत्र महिन्यातला रथोत्सव आणि अष्टमी असे दोन दिवस देवीची उत्सवमूर्ती मंदिराबाहेर नगरवासीयांच्या भेटीला निघते. नवरात्रौत्सवातला अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे अष्टमी. यादिवशी शक्तीने महिषासुराचा वध केला. यानिमित्त उद्या करवीरनिवासिनी अंबाबाईची नगरप्रदक्षिणा व मध्यरात्री जागराची पूजा होणार आहे. फुलांनी सजविलेल्या वाहनात सालंकृत पूजेने विराजमान झालेली अंबाबाईच्या उत्सवमूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी असते. रांगोळी, फुलांचा वर्षाव, औक्षणाने देवीचा हा नगरप्रदक्षिणेचा सोहळा साजरा करतात. त्यानंतर महाद्वारातून वाहन नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. महाद्वार, गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, गुरू महाराज वाडा, बिनखांबी गणेश मंदिरामार्गे पुन्हा महाद्वारातून वाहन मंदिरात प्रवेश करेल. येथे आरती झाल्यानंतर अंबाबाईची मूर्ती पुन्हा गाभाऱ्यात विराजमान होईल. रात्री बारानंतर मंदिराचे दरवाजे बंद होऊन अष्टमीच्या पूजेला प्रारंभ होईल. पहाटे चारपर्यंत ही पूजा चालेल. सकाळी आठला मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुले होईल. (प्रतिनिधी)
विष्णूने केली अंबाबाईची आराधना
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला विष्णूने आपली पत्नी लक्ष्मीच्या पुनर्प्राप्तीसाठी अंबाबाईच्या मूर्तीसमोर तपश्चर्या केली या रूपात पूजा बांधण्यात आली. ‘अगस्ती वंदना’ असे या पूजेचे नाव असून, ग्रंथोल्लेखानुसार ‘कोल्हापूरची अंबाबाई’ ही विष्णूची आई होते.
अज्ञानामुळे कोल्हापूरची अंबाबाई म्हणजेच तिरूपती-बालाजीची पत्नी असल्याचा चुकीचा समज भाविकांमध्ये झाला आहे. वास्तविक ही देवी विष्णूची पत्नी नाही, तर आई/सासू आहे. ‘करवीर माहात्म्य’ हा प्रमाणग्रंथ अगस्ती मुनी व लोपामुद्रा या ऋषी दाम्पत्याच्या संवादांतून हे रहस्य उलगडतो. तिरूमला युनिव्हर्सिटीने प्रकाशित केलेल्या ‘व्यंकटाचल माहात्म्य’ ग्रंथात भृगू ऋषींनी विष्णूच्या छातीवर लाथ मारल्यानंतर अपमानित झालेली लक्ष्मी करवीरात कपिलमुनींच्या आश्रमात वास्तव्याला आली. तिच्या शोधार्थ करवीरात आलेल्या विष्णूला अगस्ती मुनींनी आराधना केलेली अंबाबाईची मूर्ती दिसली. येथे विष्णूने लक्ष्मीच्या पुनर्प्राप्तीसाठी अंबाबाईच्या मूर्तीसमोर दहा वर्षे तपश्चर्या केली. अंबाबाईने विष्णूला आकाशवाणीने तू तिरूपती येथील सुवर्णमुखरी नदीतीरी तपश्चर्या कर, तेथेच तुला लक्ष्मी भेटेल, असे सांगितले. त्यानुसार विष्णूने तिरूपती येथे पुन्हा दहा वर्षे तपश्चर्या केली. त्यानंतर विष्णू आणि लक्ष्मीचे पुनर्मिलन झाले आणि विष्णूने स्वत: लक्ष्मीला ही घटना सांगितली, असा उल्लेख आहे. त्यानुसार अंबाबाईची आजची पूजा बांधण्यात आली. पूजेची रचना सागर मुनीश्वर व रवी माईनकर यांनी केली, तर संकल्पना उमाकांत राणिंगा व प्रसन्ना मालेकर यांची होती. सत्यजित निगवेकर यांनी मूर्ती घडवली असून, त्यासाठी चित्रकार प्रशांत इंचनाळकर यांनी साहाय्य केले. रात्री अंबाबाईची पालखी मंडप आकारात काढण्यात आली. आज दिवसभरात मंदिरात माउली महिला भजनी मंडळ, ज्ञानेश्वर माउली महिला भजनी मंडळ (राशिवडे बुद्रुक), साई मंदिर भजनी मंडळ, गजानन माउली सोंगी भजन, दीपा कामत व पवित्र भट यांचे भरतनाट्यम् (मुंबई) यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
बाजारपेठेत गर्दी...
ज्या कुटुंबाची कुलदैवत तुळजाभवानी असते, अशा कुटुंबातही अष्टमीला देवघरात चौक, मक्याची घाटं, कर्दळी यांनी चौरंग सजवला जातो.
त्यावर तुळजाभवानीची मूर्ती ठेवून तिची विधीवत पूजा करून जागर घातला जातो. त्यानिमित्त आज मक्याची घाटं, झेंडूची फुले, खाऊची पाने, ओटी अशा पूजेच्या साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी महाद्वार रोड, जोतिबा रोड, शिंगोशी मार्केट, टिंबर मार्केट येथे गर्दी केली होती.
तिरूपतीचा शालू आज अर्पण
कोल्हापूरच्या अंबाबाईप्रती असलेल्या मातृभावनेतून उद्या, गुरुवारी तिरूपती बालाजी देवस्थानच्यावतीने देवीला महावस्त्र (शालू) अर्पण करण्यात येणार आहे. सकाळी साडेदहा वाजता तिरूपती देवस्थानचे अधिकारी के. सेवलू हा शालू देवस्थान समितीकडे सुपूर्द करतील.
‘लोकमत’मुळे खरा इतिहास प्रकाशात...
कोल्हापूरच्या अंबाबाईचा ‘विष्णुपत्नी लक्ष्मी’ असा चुकीचा प्रसार झाला. ही देवी आदिशक्ती असून याचक्षेत्री सतीचे नेत्र पडल्याने हे स्थान शक्तिपीठ आहे, तर लक्ष्मी ही रुसून आपल्या आईकडे आली असता विष्णूने या अंबाबाईची आराधना करून तिची पुनर्प्राप्ती केली. अंबाबाईचा हा खरा इतिहास ‘लोकमत’ने ‘महालक्ष्मीचा इतिहास बदलतोय’ मालिकेद्वारे प्रकाशात आणत मराठमोळ्या कोल्हापूरचे दाक्षिणात्यीकरण थांबवा, अशी भूमिका घेतली. सत्य प्रकाशात आणण्यासाठीच पूजा बांधल्याचे श्रीपूजक धनश्री व सागर मुनीश्वर यांनी सांगितले.