कृषी विद्यापीठाचा आज दीक्षांत सोहळा
By admin | Published: February 5, 2016 02:14 AM2016-02-05T02:14:47+5:302016-02-05T02:14:47+5:30
नितीन गडकरी, एकनाथ खडसे, इथिओपियाचे माजी राजदूत टिबोर पी. नाझ यांची प्रमुख उपस्थिती.
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३0 वा दीक्षांत समारंभ शुक्रवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १0 वाजता दीक्षांत सभागृहात होणार आहे. या दीक्षांत समारंभाला केंद्रीय रस्ते व जड वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कृषी मंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती एकनाथ खडसे यांच्यासह इथिओपियाचे माजी राजदूत टिबोर पी. नाझ (यूएसए), अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. यावर्षी २0६९ स्नातक उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी १३८७ स्नातक प्रत्यक्ष दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून मान्यवरांच्या हस्ते पदवी ग्रहण करणार असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.जी. दाणी यांनी गुरुवारी शेतकरी सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी व संलग्नित विविध अभ्यासक्रम, कृषी अभियांत्रिकी पदवी, स्नातकोतर पदवी व आचार्य (कृषी बीएसी, एमसीए कृषी बीटेक, एमटेक, कृषी पीएच.डी.) पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना दरवर्षी दीक्षांत समारंभात पदवी प्रदान केली जाते. यावर्षीही ५ फेब्रुवारीला कृषी विद्यापीठाचा ३0 वा दीक्षांत समारंभ होणार असून, समारंभात सर्वाधिक गुणांक प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचा २७ सुवर्ण, १६ रौप्य पदके देऊन सन्मान करण्यात येणार आहे. २९ रोख व तीन पुस्तक स्वरू पात बक्षिसे प्रदान करण्यात येतील. या पदवी समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यातील कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती एकनाथ खडसे असतील. दीक्षांत भाषण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करतील. यावेळी प्रथमच अमेरिकेचे मिस्टर टिबोर पी. नाझ यांचा शेती या विषयावर दांडगा अभ्यास असून, त्यांचे मार्गदर्शन कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे, तसेच ते शेतकर्यांनाही उद्बोधक ठरेल. या समारंभाला महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे उपस्थित राहणार आहेत.