शहीद जवान गावडेंच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
By admin | Published: May 23, 2016 03:57 AM2016-05-23T03:57:28+5:302016-05-23T03:57:28+5:30
जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील चक ड्रगमुल्ला येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जवान पांडुरंग महादेव गावडे यांच्या पार्थिवावर सोमवारी
आंबोली (जि. सिंधुदुर्ग) : जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील चक ड्रगमुल्ला येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जवान पांडुरंग महादेव गावडे यांच्या पार्थिवावर सोमवारी त्यांच्या मूळ आंबोली-मुळवंदवाडी (ता. सावंतवाडी) येथेअंत्यस्कार करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सतीश कदम यांनी दिली. त्यांच्या पश्चात वडील, आई, दोन भाऊ, पत्नी प्रांजल, दोन मुले प्रज्वल (वय ५) व वेदांत(वय ४ महिने ) असा परिवार आहे.
जिल्हा प्रशासनाने जवान गावडे शहीद झाल्याची माहिती सकाळी नऊच्या सुमारास कुटुंबियांना दिली. ही बातमी समजताच गावावर शोककळा पसरली.
पांडुरंग हे २००१ मध्ये बेळगाव येथे मराठा लाईफ इन्फन्ट्रीमधून भारतीय सैन्यात भरती झाले होते. देशभर सेवा बजावताना त्यांनी विविध क्षेत्रात चमक दाखविली. ते चांगले फुटबॉल, हॉकी व बास्केटबॉलपटू होते. तसेच त्यांना रेडिओ आॅपरेटर युनिटचे पारितोषिकही मिळाले होते. गेली दोन वर्षे ते ४१ राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत होते. कुपवाडामध्ये अतिरेक्यांबरोबर सुमारे नऊ तास चाललेल्या चकमकीत जवानांनी घरात लपलेल्या पाचही अतिरेक्यांचा खातमा केला. मात्र अतिरेक्यांची गोळी वर्मी लागल्याने गावडे शहीद झाले.
गावडे कुटुंबाला सैनिकी परंपरा आहे. पांडुरंग यांचे दोन्ही मोठे भाऊही सैन्यातच आहेत. त्यापैकी गणपत हे मोठे भाऊ निवृत्त सैनिक असून, मधला भाऊ अशोक धुळे येथे एनसीसीमधून सैन्यात कार्यरत आहेत. शहीद पांडुरंग फेबु्रवारीमध्ये एका महिन्याच्या रजेवर आले होते. यावेळी त्यांनी मोठ्या मुलाचा वाढदिवस, तर धाकट्या मुलाचा नामकरण सोहळा साजरा केला होता. हा त्यांच्या कुटुंबासाठी अखेरचा क्षण ठरला. (प्रतिनिधी)