रिद्धी-सिद्धीच्या शाळेचा आज पहिला दिवस
By admin | Published: November 15, 2016 06:34 AM2016-11-15T06:34:14+5:302016-11-15T06:43:19+5:30
सयामी जुळ्या म्हणून जन्माला आलेल्या रिद्धी-सिद्धी गेल्या तीन वर्षांपासून वाडिया रुग्णालयातच राहात आहेत. वाडिया रुग्णालयच आता त्यांचे
मुंबई : सयामी जुळ्या म्हणून जन्माला आलेल्या रिद्धी-सिद्धी गेल्या तीन वर्षांपासून वाडिया रुग्णालयातच राहात आहेत. वाडिया रुग्णालयच आता त्यांचे घर बनले आहे. जन्माला आल्यापासून आई-बाबा, नातेवाइकांचे प्रेम त्यांना मिळाले नाही; पण याची कमतरता त्यांना वाडिया रुग्णालय आणि प्रथम संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कधीच जाणवू दिली नाही. आता रिद्धी-सिद्धी दोघीही तीन वर्षांच्या झाल्याने दिवाळीच्या सुट्टीनंतर सुरू होणाऱ्या शाळेत या दोघींची चिमुकली पावले पडणार आहेत.
वाडिया रुग्णालयातच राहणाऱ्या या मुलींचे पालकत्व वाडिया रुग्णालय आणि प्रथम संस्थेने स्वीकारले आहे. तीन वर्षांच्या झाल्यावर त्यांना शिक्षण मिळावे यादृष्टीने त्यांना शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केईएम रुग्णालयासमोर असलेल्या महापालिकेच्या पोयबावडी शाळेत उद्या (१५ नोव्हेंबर) सकाळी १०.३० वाजता त्या दोघी जाणार असल्याची माहिती प्रथम संस्थेच्या रेस्क्यू विभाग प्रमुख विक्रम कांबळे यांनी दिली.
रायगड जिल्ह्यातील होलवा येथे शालू नामक महिलेने २०१३मध्ये सयामी जुळ्या मुलींना जन्म दिला. पहाटे जन्माला आलेल्या या जुळ्या मुलींचा शरीराचा खालील भाग जोडला गेला होता. त्यामुळे गावकऱ्यांनी वेगळा प्रकार आहे, अशी चर्चा सुरू केली. या मुलींचे काय करायचे या विचारात असताना प्रथम संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सयामी जुळ्यांना वाडिया रुग्णालयात आणले. या दोघींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी त्यांचे पालक त्यांच्याबरोबर आले होते. त्यांना वेगळे करण्याची शस्त्रक्रिया होईपर्यंत त्यांचे पालक रुग्णालयात होते. मात्र, त्यानंतर ते दोघींना रुग्णालयात सोडून गावी निघून गेले. (प्रतिनिधी)