नव्या बांधकामांचा आज फैसला
By admin | Published: May 5, 2015 01:30 AM2015-05-05T01:30:34+5:302015-05-05T01:30:34+5:30
घनकचरा व्यवस्थापनाबाबत उचित कार्यवाही न करणाऱ्या केडीएमसीला फटकारताना नव्या बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये,
कल्याण : घनकचरा व्यवस्थापनाबाबत उचित कार्यवाही न करणाऱ्या केडीएमसीला फटकारताना नव्या बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. यावर महापालिकेतर्फे आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती देताना बांधकामांवरील स्थगिती उठविण्यासंदर्भात विनंतीअर्ज न्यायालयात सादर करण्यात आला आहे. मंगळवारी सुनावणीदरम्यान न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात दोन वर्षांपूर्वी उचित कार्यवाहीचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु, याकडे दुर्लक्ष केल्याने १३ एप्रिल रोजीच्या सुनावणीत केडीएमसीला न्यायालयाने चांगलेच फटकारले होते. महापालिका क्षेत्रात कोणत्याही नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले होते. या आदेशाने जाग आलेल्या केडीएमसी प्रशासनाने अखेर कार्यवाहीला प्रारंभ केला असून कचरा डम्पिंगसंदर्भात कृती आराखडा तयार केला आहे. आधारवाडी येथील डम्पिंग बंद करण्याबरोबरच उंबर्डे येथे कचरा टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, या ठिकाणी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी १८ महिन्यांचा लागणारा कालावधी पाहता तोपर्यंत कचरा मांडा आणि बारावे येथील आरक्षित जागांवर तूर्तास टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याला जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखविल्याने त्या ठिकाणी कचरा टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष बाब म्हणजे उंबर्डे येथील प्रकल्पाबाबत निविदाही काढण्यात आली आहे. ही सर्व माहिती न्यायालयात दिली असून नवीन बांधकामांवर टाकलेली स्थगिती उठवावी, अशी विनंती महापालिका प्रशासनातर्फे केली आहे. (प्रतिनिधी)