संत तुकाराममहाराज पालखीचे आज प्रस्थान

By admin | Published: June 16, 2017 04:42 AM2017-06-16T04:42:00+5:302017-06-16T04:42:00+5:30

जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी दुपारी येथून प्रस्थान होणार आहे. वारकऱ्यांची मांदियाळी आणि हरिनामाने गजबजलेली देहूनगरी

Today's departure from Saint Tukaram Maharaj Palkhi | संत तुकाराममहाराज पालखीचे आज प्रस्थान

संत तुकाराममहाराज पालखीचे आज प्रस्थान

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी दुपारी येथून प्रस्थान होणार आहे. वारकऱ्यांची मांदियाळी आणि हरिनामाने गजबजलेली देहूनगरी ३३२व्या प्रस्थान सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे.
शुक्रवारी पहाटे पाचला श्रींची महापूजा व शिळामंदिरातील महापूजा पालखी सोहळाप्रमुख व विश्वस्तांच्या हस्ते होईल. सकाळी ५.३० ते ६ दरम्यान पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायणमहाराज समाधीची महापूजा होईल. सहाला विश्वस्त व मनुशेठ वादिया परिवाराच्या हस्ते महापूजा होईल. सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान संभाजीमहाराज मोरे यांचे पालखी प्रस्थान सोहळा सप्ताह काल्याचे कीर्तन होणार आहे. सकाळी ९ ते ११ दरम्यान संत तुकाराममहाराजांच्या पादुकांची इनामदार वाड्यात दिलीपमहाराज मोरे इनामदार यांच्या हस्ते महापूजा होईल. त्यानंतर पादुका मुख्य मंदिरात प्रस्थानपूर्व पूजेसाठी आणल्या जातील. दुपारी २.३० च्या सुमारास पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरवात होईल. सायंकाळी पाचला पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी निघेल. सायंकाळी ६.३० वा. पालखी इनामदारवाड्यात पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाईल. तेथे मुख्य आरती होईल.
प्रस्थान सोहळ्यास सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालक मंत्री गिरीष बापट यांच्यासह विविध मान्यवर व शासकीय अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख अभिजित मोरे यांनी दिली. मंदिर व परिसराची स्वच्छता झाली आहे. ३२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संपूर्ण मंदिर परिसरावर नजर आहे.
प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्र लावण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळपासूनच दिंड्यांना प्रदक्षिणेसाठी मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येणार असून, उत्तर दरवाजाने त्यांना बाहेर पडावे लागणार आहे.

- गुुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बॉम्बनाशक दलाने व श्वान पथकाने मंदिर परिसराची तपासणी केली. या वेळी नेहमीपेक्षा तिप्पट पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पालखीचा पहिला मुक्काम गावातील देऊळवाड्याशेजारील इनामदारवाड्यात असेल. तेथून शनिवारी (दि. १७) पालखी आकुर्डीकडे रवाना होणार आहे. आकुर्डीहून रविवारी (दि. १८) पालखी सोहळा पुण्याकडे
कूच करणार आहे.

Web Title: Today's departure from Saint Tukaram Maharaj Palkhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.