भुजबळ यांना मिळणार आज डिस्चार्ज
By admin | Published: April 25, 2016 05:41 AM2016-04-25T05:41:56+5:302016-04-25T05:41:56+5:30
माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, सोमवारी सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, सोमवारी सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. डिस्चार्ज दिल्यानंतर दंतचिकित्सा बाह्यरुग्ण विभागात त्यांची तपासणी केली जाणार असून, दाताचे उपचार पूर्ण झाल्यावर त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात येणार आहे, असे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे डॉ. रोहन सिक्वेरा यांनी सांगितले.
१८ एप्रिलला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या भुजबळ यांना दातदुखी आणि छातीत दुखण्याचा त्रास होता. रुग्णालयात दाखल केले, तेव्हा त्यांचा रक्तदाब १८०-१२० इतका होता. त्यामुळे तत्काळ त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले, पण अजूनही दातांचे उपचार पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळेच सोमवारी सकाळी बाह्यरुग्ण विभागात भुजबळ यांच्या दातांचा एक्सरे काढला जाणार असून, पुढील उपचार करण्यात येणार आहेत, असे डॉ. सिक्वेरा यांनी सांगितले.
भुजबळ यांचे सिटीस्कॅन आणि सोनोग्राफी करण्यात आली होती. त्याचे अहवाल आले आहेत. भुजबळ यांच्या उजव्या मूत्रपिंडाचा आकार लहान झाला असून, प्रोस्टेटला त्रास आहे, पण या दोन्ही त्रासांसाठी त्यांच्यावर बाह्यरुग्ण विभागात उपचार होऊ शकतात. अन्य वैद्यकीय तपासणी अहवाल नॉर्मल आले आहेत. त्यामुळे सोमवारी सकाळी भुजबळ यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे डॉ. सिक्वेरा यांनी स्पष्ट केले.
भुजबळ यांचा रक्तदाब आता नियंत्रणात आला असून, रक्तातील साखरही नियंत्रणात आली आहे. त्यामुळे भुजबळ आता शारीरिकदृष्ट्या ‘फिट’ आहेत. भुजबळ यांच्या हृदयाच्या ठोक्यांची गती सामान्य होत आहे. आता त्यांना कोणताच त्रास नसल्याने, डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. सिक्वेरा यांनी सांगितले.