मराठा मोर्चाचा आज एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 03:04 AM2017-08-09T03:04:50+5:302017-08-09T03:36:19+5:30
मराठा क्रांती मोर्चासाठी हजारो मराठा बांधव मंगळवारीच मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले आहेत. बुधवारी आरक्षणासाठी मराठ्यांचा एल्गार मुंबईत घुमणार आहे. मोर्चासाठी मोर्चेकरांची शेकडो वाहने मंगळवारी सायंकाळीच मुंबईत दाखल झाली.
मुंबई : मराठा क्रांती मोर्चासाठी हजारो मराठा बांधव मंगळवारीच मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले आहेत. बुधवारी आरक्षणासाठी मराठ्यांचा एल्गार मुंबईत घुमणार आहे. मोर्चासाठी मोर्चेकरांची शेकडो वाहने मंगळवारी सायंकाळीच मुंबईत दाखल झाली. सांगली, सातारा, सोलापूर येथील मराठा आंदोलकांनी मंगळवारी दुपारी येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सेल्फी पॉइंटसमोर काळा झेंडा फडकवत सरकारचा निषेध केला आणि बुधवारच्या मोर्चाचे रणशिंग फुंकले.
बुधवारी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भगवे झेंडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची छायाचित्रे चिकटवलेली शेकडो वाहने मंगळवारी दुपारपासूनच मुंबईत दाखल झाल्याचे पाहावयास मिळाले. मराठा मोर्चासाठी जवळपास २० हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरणार आहे. सकाळी ७ वाजल्यापासून पोलीस कर्तव्यावर हजर राहणार आहेत. दक्षिण आणि मध्य मुंबईत विशेष बंदोबस्त तैनात आहे. मोर्चाच्या प्रत्येक मार्गावर पोलीस गस्त घालणार आहेत. पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्यासह पाचही सहआयुक्त
आणि मुंबईतील ९४ पोलीस ठाण्यातील पोलीस मोर्चा वेळी
हजर असतील. पोलिसांच्या दिमतीला केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या १५ तुकड्या, राज्य दहशतवाद विरोधी दल (एटीएस), बॉम्बशोधक व नाशक पथक, शीघ्रकृती दल, फोर्सवन आणि सिव्हिल डिफेन्स तैनात ठेवण्यात आले आहे.
शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून गुप्तचर तपास यंत्रणाही लक्ष
ठेऊन आहे.
पाच रणरागिणी देणार निवेदन
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या आतापर्यंतच्या पद्धतीनुसार पाच रणरागिणीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन सादर करणार आहेत. मुख्यमंत्री मोर्चाला स्वत: सामोरे जाणार की त्यांना निवेदन दिले जाणार, याबाबत संभ्रमावस्था होती ती मंगळवारी सायंकाळी संपुष्टात आाली. सकल मराठा समाज संयोजन समितीच्या पदाधिकाºयांनीच ही माहिती दिली.
हा मोर्चा सकाळी ११ वाजता भायखळ््याच्या राणीबागेपासून सुरू होईल. साधारणत: दुपारी १ वाजेपर्यंत हा मोर्चा आझाद मैदानात पोहोचेल, असा अंदाज आहे. तिथे व्यासपीठाची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी १ वाजता मुंबई, औरंगाबाद व नाशिकच्या पाच तरुणी मोर्चासमोर समाजाचे प्रश्न मांडतील. प्रत्येकी ५ मिनिटांचा त्यांना अवधी असेल. त्यानंतर जे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले जाणार आहे, त्याचे वाचन केले जाईल. त्याच दरम्यान मुंबईतील अन्य पाच तरुणी हे निवेदन घेऊन मुख्यमंत्र्यांना विधिमंडळात किंवा मंत्रालयात जाऊन भेटतील व मागण्यांचे निवेदन सादर करतील. तिथे कोणताही राजकीय नेता असणार नाही की तिथे कोणतीही चर्चा होणार नाही. यापूर्वी जिल्हास्तरांवर जे मोर्चे निघाले, तेव्हाही जिल्हाधिकाºयांना अशाच पद्धतीने निवेदन सादर करण्यात आले होते. ते येथे मुख्यमंत्र्यांना सादर होईल.
त्यानंतर मोर्चाच्या ठिकाणी राष्ट्रगीत झाल्यानंतर मोर्चा समाप्त होईल, असे साधारण नियोजन आहे. किमान २ वाजेपर्यंत हा मोर्चा संपावा, असा प्रयत्न आहे. मोर्चासाठी राज्यभरातून आलेल्या मावळ््यांना परतीचा प्रवास सुलभ व्हावा व फार रात्र होऊ नये, याची दखल घेण्यात आली आहे.
पोलिसांनी सुमारे १५ लाख लोक मोर्चात सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला असला, तरी 25 लाखांहून जास्त मराठा मावळे या मोर्चात आपली ताकद देशाला दाखवून देतील, असा दावा सकल मराठा समाज संयोजन समितीने व्यक्त केला आहे.
चर्चा नको, आरक्षण हवे
समस्त मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला असताना, आता चर्चा कसली करताय? असा सवाल करत आता चर्चा नको तर आरक्षण हवे, अशी जोरदार मागणी विरोधकांनी विधान परिषदेत केली.
९ आॅगस्ट रोजी मुंबईत निघणाºया मराठा क्रांती मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर कामकाज पत्रिकेतील सर्व कामकाज बाजूला ठेऊन नियम २६०नुसार मराठा आरक्षणावर चर्चा घ्यावी, अशी मागणी शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी केली. त्याला संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनीही पाठिंबा दिला.
विरोधी पक्षांनी याला जोरदार आक्षेप घेतला. उद्याचा मोर्चा सभागृहातील चर्चेसाठी येत नसल्याचे सांगत, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, २०१४पासून सभागृहात मराठा आरक्षणावर फक्त चर्चाच होते आहे. हे सरकार आल्यापासून या विषयावर अनेकदा चर्चा झाली. मात्र, आरक्षण मिळाले नाही, असा आरोप करत विरोधकांनी सभापतींसमोरील मोकळ्या हौद्यात उतरून गदारोळ केला. या गदारोळामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृह तहकूब केले.
८ विशेष लोकल धावणार
महेश चेमटे
मुंबई : शहरातील मोर्चेकरांच्या निमित्ताने होणाºया महागर्दीसाठी रेल्वे प्रशासनदेखील सज्ज झाले आहे. मोर्चेकरांच्या सोयीसाठी सीएसएमटी-कल्याण, कल्याण-सीएसएमटी, पनवेल-सीएसएमटी, सीएसएमटी- पनवेल मार्गावर प्रत्येकी २ विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दुपारी मोर्चा आटोपल्यानंतर मोर्चेकरांच्या प्रवासासाठी मनमाड-अहमदनगर आणि लोणावळा-पुणेमार्गावर चालवण्यासाठी दोन विशेष एक्स्प्रेस राखून ठेवण्यात येणार आहेत. रेल्वे सुरक्षा बलातर्फे स्थानकांवर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मध्य रेल्वेमार्गासह हार्बरमार्गावर मरेच्या विशेष लोकल धावणार आहेत. मोर्चेकरांसाठी दुपारीदेखील ‘पिक-अव्हर’प्रमाणे लोकल सोडण्यात येतील. मोर्चेकरांच्या परतीच्या प्रवासासाठी सीएसएमटी-कल्याण, कल्याण-सीएसएमटी, पनवेल-सीएसएमटी, सीएसएमटी-पनवेल या मार्गांवर आठ विशेष लोकल चालवण्यात येतील. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच अन्य भागांतील गाड्यांना एक-एक जादा डबा जोडण्यात आला आहे. त्यात तिरुनुवेली-दादर गाडीस मिरज, नागपूर-सीएसएमटी नंदिग्राम एक्स्प्रेसला नागपूर, महालक्ष्मी एक्स्प्रेसला कोल्हापूर येथे, चेन्नई-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेसला सोलापूर, देवगिरी एक्स्प्रेसला मनमाड, आदी गाड्यांना एक सर्वसाधारण वर्गातील डबा जोडणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.
गर्दीच्या ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाचा बंदोबस्त
स्थानकांवरील गर्दीमुळे अनुचित प्रकरण टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने गर्दीची स्थानके निश्चित केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३० जवान, भायखळा येथे १२ जवान, मुलुंड, बेलापूर, कुर्ला येथे प्रत्येकी सहा जवानांची नेमणूक करण्यात आली आहे. वाशी आणि वडाळा स्थानकांवर अनुक्रमे सात आणि आठ अतिरिक्त जवानांची नेमणूक केली आहे, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे मुख्य सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी दिली.
बेस्ट मार्गात बदल
मुंबई : मुंबईमध्ये होत असलेल्या मराठा क्रांती मोर्चासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. याचा परिणाम बेस्ट सेवेवरही होणार आहे. मोर्चामार्गावरील काही बसमार्ग या काळात बंद ठेवण्यात येणार आहेत. तर काही बसमार्ग इतर मार्गाने वळविण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. शहरातील वाहतुकीत सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत बदल करण्यात आले आहेत. मोर्चामध्ये सहभागी होणारे जिजामाता उद्यान येथे जमून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरमार्गावरील दक्षिण वाहिनीने जे. जे. उड्डाणपुलावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे यू-टर्न घेऊन आझाद मैदान येथे पोहोचणार आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी हा मार्ग मोकळा ठेवण्याची सूचना केली आहे. या मार्गांवर बेस्टच्या बसेस या काळात धावणार नाहीत.
या मार्गांवरील बससेवा बंद
जे. जे. उड्डाणपुलावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जंक्शनपर्यंत दक्षिण आणि उत्तर वाहिन्यांना (येणारी-जाणारी) पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आझाद मैदान शेजारील ओ. सी. एस. जंक्शन ते छत्रपती शिवाजी महाराज जंक्शनपर्यंत जाणारा हजारीमल सोमानी मार्ग, मेट्रो जंक्शन ते मुंबई महानगरपालिका मार्ग आणि भाटिया बाग ते छत्रपती शिवाजी महाराज जंक्शनकडे येणारे उजवे वळण बंद करण्यात आले आहे.कर्नाक बंदर जंक्शनकडून कर्नाक ब्रीजकडे जाण्यासाठी वाहनांना प्रतिबंध आहे.