आरटीई प्रवेशाची आज पहिली लॉटरी
By Admin | Published: March 4, 2017 01:16 AM2017-03-04T01:16:56+5:302017-03-04T01:16:56+5:30
पुणे जिल्ह्यातील जागांसाठी ३७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत
पिंपरी : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राबविल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात असून, पुणे जिल्ह्यातील जागांसाठी ३७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच, शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेशप्रकियेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, प्रवेशाची पहिली लॉटरी ४ मार्च रोजी काढली जाणार आहे.
शालेय शिक्षण विभागातर्फे फेब्रुवारी महिन्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. शासनाच्या संकेतस्थळावर २ मार्चपर्यंत आॅनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याची मुदत होती. त्यामुळे
सर्व जिल्ह्यांमधील आरटीईच्या जागांसाठी पालकांनी पाल्यांचे आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरले.
काही जिल्ह्यांमधून आरटीई प्रवेशास चांगला प्रतिसाद मिळत असला तरी कोल्हापूर, नंदुरबार, परभणी, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांतून अल्प प्रतिसाद मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील ८४९ शाळांमधील १५,६९३ जागांसाठी ३७,२०८ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आल्याने प्रवेशासाठी ५ वेळा लॉटरी काढली जाणार आहे. पुणे जिल्ह्यापाठोपाठ नागपूर जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. नागपूरमध्ये आरटीईच्या ७,०९० जागांसाठी २३,५४७ अर्ज आले. मुंबईमध्ये ८,५९३ जागांसाठी ९,४६३, अमरावतीमध्ये २,९२० जागांसाठी ५,१३३, औरंगाबादमध्ये ५,५५१ जागांसाठी ८,४३५, नाशिकमध्ये ६,३८० जागांसाठी ६,५५२ आणि यवतमाळमध्ये १,७४१ जागांसाठी ३,१३६ अर्ज आले आहेत. आरटीई प्रवेशप्रक्रिया सर्व जिल्ह्यांत सुरू आहे; परंतु पालकांमध्ये जागृती न झाल्याने अनेक जिल्ह्यांत अद्याप ८०० ते ९०० अर्ज प्राप्त झाले आहेत.
जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख म्हणाले, की विभागातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका परिसर व ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यम शाळांमधील आरटीई जागांसाठी २ मार्चपर्यंत आॅनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारण्यात आले. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज आले. (प्रतिनिधी)
>आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना कायद्यानुसार प्रवेश देणे बंधनकारक आहे. ज्या शाळा प्रवेश देण्यास सहकार्य करणार नाहीत, अशा शाळांविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई करावी. एकही बालक प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. - गोविंद नांदेडे,
प्राथमिक शिक्षण संचालक,
महाराष्ट्र राज्य