अकरावीची आज पहिली विशेष गुणवत्ता यादी; प्रवेशासाठी २ दिवस
By admin | Published: August 11, 2016 04:28 AM2016-08-11T04:28:05+5:302016-08-11T04:28:05+5:30
अकरावी प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या विशेष आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी गुरुवारी, ११ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे
मुंबई : अकरावी प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या विशेष आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी गुरुवारी, ११ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे. या फेरीसाठी दोन दिवसांत एकूण ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विशेष यादीत नाव जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना शुक्रवार व शनिवारी संबंधित महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. तर या फेरीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या विशेष फेरीत प्रवेशाची आणखी एक संधी मिळणार आहे.
विशेष गुणवत्ता यादीत आवडते महाविद्यालय मिळाल्यावर विद्यार्थ्यांना आधी प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयातील प्रवेश रद्द करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना आवडते महाविद्यालय मिळाले नाही, तर दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. १७ किंवा १८ आॅगस्ट रोजी दुसऱ्या विशेष गुणवत्ता यादीसाठी नव्याने लॉगीन आयडी आणि पासवर्ड देण्यास सुरुवात होईल, असे उपसंचालक कार्यालयाने सांगितले. पहिल्या विशेष फेरीसाठी सुमारे ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्धवट अर्ज भरले आहेत. त्यांनाही १५० रुपये भरून नवा लॉगीन आयडी व पासवर्ड घेऊन अर्ज नोंदणी करावी लागेल, असे प्रशासनाने सांगितले.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अर्ज नोंदणीसाठी दिलेल्या दोन दिवसांत एकूण ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासह पसंतीक्रम अर्ज दाखल केले आहेत. याउलट २६ हजार ८६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज अर्धवट भरला आहे. २७७ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरल्यानंतर तो कन्फर्म केला नाही, तर प्रवेश अर्ज कन्फर्म केल्यानंतर ३ हजार २२७ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्जच भरला नाही. १६७ विद्यार्थ्यांनी अर्धवट पसंतीक्रम अर्ज भरला, तर ५०३ विद्यार्थ्यांनी तो कन्फर्म केला नाही. अशाप्रकारे एकूण ३१ हजार ०४० विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत सामील होऊ शकले नाहीत. त्यांना आणखी दोन विशेष फेऱ्यांमध्ये प्रवेशाच्या संधी उपलब्ध आहेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)