आरोग्य विभागाची आजपासून राज्यभर गोवर-रुबेला लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 06:03 AM2018-11-27T06:03:19+5:302018-11-27T06:03:33+5:30
३ कोटी ३८ लाख बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट : लस सुरक्षित असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती
मुंबई : गोवर आणि रुबेला या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत मंगळवार दिनांक २७ नोव्हेंबरपासून राज्यभर व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ९ महिने ते १५ वर्षांखालील सुमारे ३ कोटी ३८ लाख बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, राज्यातील सुमारे ९५ टक्के बालकांना लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. ही लस सुरक्षित असून, पालकांनी आपल्या बाळाला लस टोचून घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे केले.
विधानभवनात पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी आरोग्य विभागाचे राज्यमंत्री विजय देशमुख उपस्थित होते. उद्या सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनाच्या प्रांगणात या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या सत्रात म्हणजेच पहिल्या दोन आठवड्यांत सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यापुढील दोन आठवडे अंगणवाडी, फिरत्या पथकाद्वारे व बाह्यसंपर्क लसीकरण सत्र राबविण्यात येणार आहे. शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये ज्या बालकांचे या मोहिमेत लसीकरण झालेले नाही, त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
...तर रुग्ण दगावण्याची शक्यता
गोवरमुळे भारतात दरवर्षी ५० हजार रुग्ण मुत्युमुखी पडतात. गोवर आलेल्या रुग्णामध्ये ताप, अंगावर लालसर पुरळ येणे, सर्दी, खोकला व शिंका येणे अशी लक्षणे दिसून येतात. गोवरमुळे रुग्णाच्या शरीरातील अ जीवनसत्वाचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळे रुग्णाला डोळ्यांचे आजार, तसेच रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने अतिसार, मेंदूज्वर, न्यूमोनिया असे आजार ही होऊ शकतात व वेळीच उपचार न केल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते.