साखरे आश्रमशाळेच्या इमारतीचे आज उद्घाटन
By Admin | Published: December 26, 2016 04:28 AM2016-12-26T04:28:23+5:302016-12-26T04:28:23+5:30
वर्षभरापासून साखरे आश्रमशाळेच्या नवीन भव्य दोन इमारती तयार असतानाही, ४५० विद्यार्थ्यांना नरक यातना देणाऱ्या जुनाट
राहुल वाडेकर / विक्रमगड
वर्षभरापासून साखरे आश्रमशाळेच्या नवीन भव्य दोन इमारती तयार असतानाही, ४५० विद्यार्थ्यांना नरक यातना देणाऱ्या जुनाट इमारतीतच शिकण्यास व वास्तव्य करण्यास भाग पाडले जात होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच जाग आलेल्या आदिवासी विकास खात्याने या इमारतीचे उद्घाटन तातडीने सोमवारी आयोजित केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखाताई थेतले, लोकसभा सदस्य चिंतामण वनगा, कपिल पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे़
त्यामुळे आता या शासकीय आश्रमशाळेतील ४५० विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न सुटणार आहे, परंतु येथे या विद्यार्थ्यांना सेवाप्रदान करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची निम्मी पदे रिक्त आहेत त्याचे काय, असा सवाल आहे़ कारण या साखरे आश्रमशाळेमध्ये महिला अधीक्षकाचे पद रिक्त असून, एकूण २९ कर्मचाऱ्यांपैकी १० कर्मचारीपदे रिक्त आहेत़, तर या मुलांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या यंत्रणेमध्ये ज्यांच्यावर आरोग्याची जबाबदारी आहे, त्या विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात एकच डॉक्टर आहे, तर इतरही कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने, तेदेखील रुग्णांसाठी धोक्याचे बनले आहे़
आम्ही वरिष्ठांच्या आदेशान्वये नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये नवीन इमारतीत आश्रमशाळेचा कारभार सुरू होण्यासाठी प्रयत्नशील होतो.
- एस.एस. सूर्यवंशी, मुख्याध्यापक साखरे आश्रमशाळा