आजकालच्या नेत्यांची लायकी नाही
By Admin | Published: July 5, 2015 03:25 AM2015-07-05T03:25:13+5:302015-07-05T03:25:13+5:30
देशात आता असे राजकारणी नाहीत की पुढील ५० वर्षांनंतरच्या इतिहासात त्यांचे नाव घ्यावेसे वाटेल. तेवढी आजकालच्या नेत्यांची लायकीदेखील नाही, असा टोला शिवसेना
मुंबई : देशात आता असे राजकारणी नाहीत की पुढील ५० वर्षांनंतरच्या इतिहासात त्यांचे नाव घ्यावेसे वाटेल. तेवढी आजकालच्या नेत्यांची लायकीदेखील नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कुणाचाही थेट नामोल्लेख न करता लगावला आहे.
दादर येथील बालमोहन विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शाळेतील ८वीच्या ४०० विद्यार्थ्यांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते टॅबचे मोफत वाटप करण्यात आले. उद्धव हे बालमोहन शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.
यावेळी समोर लावलेल्या स्वा. सावरकर, लोकमान्य टिळक यांच्या तसबिरींकडे अंगुलीनिर्देश करीत उद्धव म्हणाले की, माझ्यासमोर बसलेल्या या विद्यार्थ्यांना पुढील ५० वर्षांनंतर नाव घ्यावेसे वाटेल असा राजकारणी नाही. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी झाले पाहिजे. न्यायालयाने तसे निष्कर्ष नोंदवले आहेत. हे ओझे कोण कमी करणार, याची वाट न पाहता मी सुरुवात केली आहे. या वेळी रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व महापौर स्नेहल आंबेकर आदी उपस्थित होते. ‘नवनीत’चे अमित गाला यांनी टॅब कसा हाताळावा त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. या कार्यक्रमाला शिक्षकवर्ग आणि पालकांनीही उपस्थिती दर्शवली होती. (विशेष प्रतिनिधी)