आजचा दिवस मराठी नाटकांचा..!
By Admin | Published: January 26, 2017 05:25 AM2017-01-26T05:25:03+5:302017-01-26T05:25:03+5:30
मराठी नाट्यसृष्टीवर झालेला नोटाबंदीचा परिणाम हळूहळू ओसरू लागला आहे. मराठी नाटकांना सध्या उधाण आल्याचे चित्र आहे. त्याचेच थेट प्रतिबिंब
राज चिंचणकर / मुंबई
मराठी नाट्यसृष्टीवर झालेला नोटाबंदीचा परिणाम हळूहळू ओसरू लागला आहे. मराठी नाटकांना सध्या उधाण आल्याचे चित्र आहे. त्याचेच थेट प्रतिबिंब आजच्या प्रजासत्ताक दिनी पडलेले दिसणार आहे. याचे कारण म्हणजे, नवीन वर्षातल्या या पहिल्यावहिल्या सार्वजनिक सुट्टीचा मुहूर्त साधत, आज मुंबई परिसरातल्या सर्वच नाट्यगृहांत मराठी नाटकांचे धडाक्यात प्रयोग लावण्यात आले आहेत.
मुंबई आणि मुंबईच्या आसपास असलेल्या नाट्यगृहांच्या आजच्या तारखा नाट्यप्रयोगांनी फुल्ल झाल्या आहेत. आजचे आघाडीचे अनेक कलावंत या विविध नाटकांत भूमिका साकारत आहेत. या प्रयोगांना मायबाप रसिकांकडून ‘तथास्तु’ असा भरभरून आशीर्वाद मिळवण्याच्या प्रतीक्षेत मराठी नाट्यसृष्टी आहे. दादरच्या शिवाजी मंदिरात, सकाळच्या प्रहरी, आजच्या आघाडीच्या कलावंतांची फौज असलेल्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकाचा प्रयोग आहे, तर विलेपार्लेच्या दीनानाथ नाट्यगृहात सकाळी प्रशांत दामलेच्या ‘साखर खाल्लेला माणूस’ या नव्या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या ‘कोडमंत्र’ या नाटकाचे दोन प्रयोग आज एकाच दिवशी आहेत. दुपारच्या वेळेत माटुंग्याच्या यशवंत नाट्यगृहात, तर रात्री दीनानाथ नाट्यगृहात हे प्रयोग आहेत. शिवाजी मंदिरात रात्रीच्या सत्रात अभिनेत्री श्वेता पेंडसेचे ‘आईचं पत्र हरवलं’ हे नवीन नाटक रंगणार आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवची प्रमुख भूमिका असलेले ‘गेला उडत’ हे नाटक दुपारी परळच्या दामोदर नाट्यगृहात आहे, तर अभिनेता जितेंद्र जोशीचे ‘दोन स्पेशल’ हे नाटक दीनानाथ नाट्यगृहात दुपारी रंगणार आहे. या सगळ्या धामधुमीत काही महत्त्वाचे योगही जुळून आले आहेत आणि ते म्हणजे, ‘तीन
पायांची शर्यत’, ‘दीपस्तंभ’, व ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या तिन्ही नाटकांचे रौप्यमहोत्सवी प्रयोग दुपारी अनुक्रमे शिवाजी मंदिर, डोंबिवलीचे सावित्रीबाई फुले नाट्यगृह व बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात आहेत.