आजचा मोर्चा ही सुरुवात; महाराष्ट्र द्रोह्यांना गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, महामोर्चात उद्धव ठाकरेंचा हुंकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 02:38 PM2022-12-17T14:38:48+5:302022-12-17T14:41:21+5:30
"या महाराष्ट्र द्रोह्यांचा राजकारणात शेवट केल्याशिवाय आता स्वस्त बसता येणार नाही."
आज आम्ही पक्ष वैगेरे सर्व बाजूला ठेऊन, महाराष्ट्राच्या प्रेमासाठी, महाराष्ट्र द्रोह्यांना या मातीत गाडण्यासाठी एकवटलो आहोत आणि ते गाडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. हीच एक शिवचरणी शपथ घेतो, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आणि शिवसेनेवर (एकनाथ शिंदे गट) निशाणा साधला आहे. ते आज मुंबईत शिंदे-फडणवीस सरकारला टार्गेट करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या महामोर्चात बोलत होते.
...तर हे रस्त्यावर जमलेला आगडोंब पेटल्याशिवाय राहणार नाही -
उद्धव ठाकरे म्हणाले, "आम्ही सर्वजन ही आमची मातृभूमी मानतो. मुंबई काय महाराष्ट्र काय ही आमची मातृभूमी आहे. पण आमचे पालकमंत्री मुंबईचा हिशेब स्क्वेअर फुठात करतात. ती विकली जाणारी जागा नाही. ती आमची माय आहे. आमची माय माऊली आहे. मुंबा आई आहे आणि तिच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न केला, तर हे रस्त्यावर जमलेला आगडोंब पेटल्याशिवाय राहणार नाही."
या महाराष्ट्र द्रोह्यांचा राजकारणात शेवट केल्याशिवाय स्वस्त बसता येणार नाही -
"कर्नाटकसह हे सर्वजण एकत्रितपणे महाराष्ट्रावर तुटून पडत आहेत. म्हणजे एकाबाजूला महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवायची, त्यांचा अपमान करायचा, येऊ शकणारे आणि येणारे, म्हणजे महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर असणारे उद्योग धंदे दुसऱ्या राज्यात पळवून न्यायचे. गावं कुर्तडायला लागायची. म्हणजे चहूबाजूंनी महाराष्ट्र कसा भिकेला लागेल, हा यांचा प्रयत्न आहे. या महाराष्ट्र द्रोह्यांचा राजकारणात शेवट केल्याशिवाय आता स्वस्त बसता येणार नाही," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
हीच महाराष्ट्राची वज्रमूठ -
यावेळी, "आजचा मोर्चा ही सुरुवात आहे. या मोर्चाची ताकद बघायची असेल तर, मी सर्वांना एकच विनंती करतोय. की आपापल्या हातांच्या मुठी उंचावून वळा आणि वर करा. हीच महाराष्ट्राची ताकद आहे. हीच महाराष्ट्राची वज्रमूठ आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.