वसंत बापट यांचा आज स्मृतिदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2016 09:55 AM2016-09-17T09:55:43+5:302016-09-17T09:55:43+5:30
सुप्रसिद्ध मराठी कवी वसंत बापट यांचा आज स्मृतिदिन
>प्रफुल्ल गायकवाड
पुणे, दि. 17 - (२५ जुलै, इ.स. १९२२ - १७ सप्टेंबर, इ.स. २००२)
सुप्रसिद्ध मराठी कवी. जन्म सातारा जिल्ह्यातील कराडचा. पुण्याच्या स.प. महाविद्यालयातून एम्. ए.(१९४८).त्यानंतर मुंबईतील ‘नॅशनल कॉलेज’ आणि ‘रामनारायण रुईया कॉलेज’ ह्या महाविद्यालयांतून मराठी आणि संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक. १९७४ पासून मुंबई विद्यापीठातील गुरुदेव टागोर अध्यासनाचे प्राध्यापक. साहित्य अकादेमीचे ते सदस्य आहेत.
लहानपणापासून बापटांवर राष्ट्र सेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहावासाचे संस्कार झाले. बिजली (१९५२) ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर ह्या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. सेतु (१९५७), अकरावी दिशा (१९६२), सकीना (१९७२) आणि मानसी (१९७७) हे त्यांचे बिजलीनंतरचे काव्यसंग्रह. बिजली ते मानसीपर्यंत त्यांच्या कवितेचा झालेला प्रवास कवी म्हणून झालेल्या त्यांच्या विकासाचा द्योतक आहे. बिजलीनंतरच्या काव्यसंग्रहांतून त्यांच्या अनुभवांचे क्षेत्रही उत्तरोत्तर अधिकाधिक विस्तारत गेल्याचे दिसते. संस्कृत आणि इंग्रजी कवितेचा प्रभावही ह्या कवितेवर दिसून येतो. सामाजिक विषमता आणि अन्याय ह्यांच्या तीव्र जाणिवेबरोबरच यौवनाचा अभिजात डौल, निसर्गाच्या विभ्रम-विलासांतून खट्याळ शृंगार व्यक्तविण्याची प्रवृत्ती, लावणीसारख्या जुन्या काव्यप्रकाराचे पुररुज्जीवन करण्याचा रसिक प्रयत्न ह्यांचा प्रत्यय त्यांच्याबिजलीनंतरच्या कवितेत येतो. त्यांच्या कवितेचे परिपक्व रूपमानसीमध्ये विशेषत्वाने जाणवते. ह्या काव्यसंग्रहातील त्यांची कविता मितभाषी; परंतु आशयदृष्ट्या अधिक गहन अशी आहे.
जनजागृती करणे हेही कवितेचे एक महत्त्वाचे कार्य आहे, असे बापट मानत असल्यामुळे राष्ट्रीय संकटाच्या, दु:खाच्या वा देशातील विविध जन-आंदोलनांच्या प्रसंगी त्यांनी आपली संवेदनशील प्रतिक्रिया आपल्या कवितेतून व्यक्तविली आहे. ‘उत्तुंग आमुची उत्तरसीमा इंच इंच लढवू’ ही त्यांची गाजलेली कविता किंवा त्यांनी रचिलेला ‘संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा’ ही त्याची काही उल्लेखनीय उदाहरणे हात. ‘गांधींची जीवनयात्रा’ (१९४८), ‘नव्या युगाचे पोवाडे’ (भाग १ ते ३), ‘सैन्य चालले पुढे’ (१९६५) ह्या त्यांच्या रचनाही ह्या संदर्भात निर्देशनीय आहेत.
संस्कृतातील अभिजातता आणि नादवती शब्दकळा; बंगालीतील-विशेषत: गुरुदेव टागोरांच्या कवितेतील-मानवतावाद आणि इंग्रजी कवितेतील स्वच्छंदतावादी प्रवृत्ती ह्यांचे ठळक संस्कार बापटांच्या कवितेवर झालेले दिसतात. बापटांची अस्सल रसिकता आणि अतींद्रिय अनुभवांना रूपरसगंधाचे लावण्य प्राप्त करून देणारी त्यांची बहुरंगी प्रतिमासृष्टी हेही त्यांच्या कवितेचे विशेष लक्षणीय पैलू होत.
बारा गावचे पाणी (१९६७) हा बापटांचा प्रवासवर्णनपर ग्रंथ. बापटांच्या रसिक मनाने भारताचा निसर्ग, चालीरीती, लोककला, वैज्ञानिक प्रगतीच्या दिशेने होत असलेली त्याची वाटचाल ह्यांचे जे दर्शन घेतले, त्याचे प्रत्ययकारी चित्रण ह्या ग्रंथात त्यांनी केले आहे.
सेतु ह्या काव्यसंग्रहास व लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या बालगोविंद (१९६५) ह्या नाटकास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला. तौलनिक साहित्याभ्यास (१९८१) हा त्यांचा ग्रंथ.
संगीत, अभिनय, लोककला, ह्यांची उत्तम जाण बापटांच्या ठायी आहे. राष्ट्रसेवा दलातर्फे त्यांनी सादर केलेल्या ‘महाराष्ट्र दर्शन’, ‘भारत दर्शन’ ह्यांसारख्या यशस्वी कार्यक्रमांतून तिचा प्रत्यय येतो.
सौजन्य : मराठी विश्वकोश