विष्णुदास भावे यांचा आज स्मृतिदिन

By Admin | Published: August 9, 2016 08:04 AM2016-08-09T08:04:21+5:302016-08-09T08:04:21+5:30

मराठी रंगभूमीचे जनक विष्‍णु अमृत भावे यांचा आज स्मृतिदिन

Today's Memorial Day of Vishnudas Bhave | विष्णुदास भावे यांचा आज स्मृतिदिन

विष्णुदास भावे यांचा आज स्मृतिदिन

googlenewsNext
>प्रफुल्ल गायकवाड -
मुंबई, दि. 9 -  मराठी रंगभूमीचे जनक. संपूर्ण नाव विष्‍णु अमृत भावे. सांगली संस्थानाचे अधिपती श्रीमंत चितांमणराव ऊर्फ आप्पासाहेब पटवर्धन ह्यांच्या खाजगीकडे ते नोकर होते. कथा-कविता लिहिण्याचा नाद विष्णूदासांना होता. १८४२ मध्ये कर्नाटकातून 'भागवत' नावाची एक नाटकमंडळी सांगलीत आली होती. तिचे खेळ पाहिल्यानंतर तशा प्रकारचे नाट्यप्रयोग काही सुधारणा करून मराठीत केले, तर त्यांचे चांगले स्वागत होईल, अशी कल्पना आप्पासाहेबांच्या मनात आली व हे काम त्यांनी विष्णुदासांवर सोपविले. त्यानुसार विष्णुदासांनी १८४३ मध्येसीतास्वयंवर ह्या स्वतःच रचिलेल्या नाटकाचा यशस्वी प्रयोग करून दाखविला. त्यानंतर रामायणातील विषयांवर दहा नाटके लिहून त्यांचे प्रयोग त्यांनी सांगली संस्थानात केले. तेही लोकप्रिय झाले. सूत्रधाराकडून मंगलाचरण, नंतर वनचरवेषधारी विदूषकाचा प्रवेश, त्याचे आणि सूत्रधाराचे विनोदी संभाषण, विघ्‍नहर्त्या गजाननाचे स्‍तवन, सरस्‍वतीस्‍तवन, गजानन व सरस्वती ह्यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर नाटकास प्रारंभ, अशी विष्‍णुदासांच्या नाट्यप्रयोगांची पद्धती होती. नाटकाच्या आरंभापासून त्याची अखेर होईपर्यंत सूत्रधारास काम असे. सादर होणाऱ्या नाट्यप्रसंगांचे वर्णन सूत्रधाराने पद्यातून केल्यानंतर संबंधित पात्रे रंगभूमीवर येवून आपापली भाषणे करीत. सर्वच भाषणे आधी लिहीलेली नसत. नट स्वयंस्फूर्तीनेही तेथल्या तेथे प्रसंगोचित भाषणे करीत. नृत्य-गायनाला ह्या नाटकांतून बराच वाव दिला जाई. नाटकातील प्रवेशाला 'कचेरी' असे नाव दिलेले होते. भावे ह्यांनी पुढे महाभारतातील कथानकांवरही नाटके लिहिली. विष्णुदास नाटकांत पखवाजाची साथ प्रमुख असे. नाट्यप्रसंगाला अनुकूल असे कोमल, गंभीर वा तीव्र असे बोल पखवाजावर वाजविले जात असत. ह्या पखवाजाच्या आवाजावरून ह्या नाटकांना ' तागडथोम नाटके ' असे म्हटले जाई. तसेच त्यांतील राक्षसांच्या 'अलल् डुर्र' अशा डरकाळीमुळे ' अलल् डुर्र ' नाटके असे त्यांना संबोधिले जात असे. चिंतामणराव पटवर्धनांचे निधन झाल्यावर (१८५१) विष्णुदासांना सांगली संस्थानाकडून मदत मिळेनाशी झाली. त्यामुळे त्यांना नाट्यप्रयोगासाठी गावोगावी दौरे काढावे लागले. नाटककार, दिग्दर्शक, कपडेवाला, रंगवाला इ. सर्व काही विष्णुदास स्वतःच असत. १८६१ पर्यंत ते नाट्यव्यवसायात होते. व्यवसायनिवृत्तीनंतरचे आयुष्य त्यांनी सांगली येथेच घालविले. तेथेच प्लेगचे त्यांचे निधन झाले.
 
भावे ह्यांची नाटके बरीचशी पद्यमय होती आणि त्यांचील पद्यरचनेचे, प्राचीन मराठी आख्यानकरचनेशी निकटचे नाते होते. त्यांच्या नाटकांसाठी त्यांनी विविध छंदात केलेल्या पद्यरचनांचा उल्लेख ' नाट्याख्याने ' असाही करण्यात येतो. विष्णुदासी नाटकांचा मुख्य भाषारूप आधार म्हणजे ही पदेच होत. भावे ह्यांची पन्नासांहून अधिक नाट्याख्यानेनाट्यकवितासंग्रह (१८८५) ह्या नावाने प्रसिद्ध झालेली आहेत. विष्णुदासांच्या ह्या नाट्याख्यानांना स्वरसाज चढविताना विविध रागरागिण्यांचा आणि त्यांच्या मिश्रणांचा विष्णुदासांनी प्रभावीपणे उपयोग करून घेतला होता. विष्णुदासांच्या नंतरच्या ५०-६० वर्षांत मराठी पौराणिक नाटके लिहिणाऱ्यांना विष्णुदासांनी निर्माण केलेला पौराणिक नाटकाचा साचा उपयोगी पडला. इतकेच नव्हे, तर विष्णुदासकृत पदांचा उपयोगही काही नाटककारांनी आपल्या नाटकांतून केल्याचे दिसते. नाट्यप्रयोगाची एक निश्चित संकल्पना समोर ठेवून नाटक सादर करणारी पहिली नाटकमंडळी महाराष्ट्रात विष्णुदासांनी उभी केली.
(१८१८-९ ऑगस्ट १९०१). 
 
सौजन्य : मराठी विश्वकोश 
 

Web Title: Today's Memorial Day of Vishnudas Bhave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.