आजपासून मेल-एक्स्प्रेसचे नवे वेळापत्रक
By admin | Published: October 1, 2016 02:50 AM2016-10-01T02:50:04+5:302016-10-01T02:50:04+5:30
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार १ आॅक्टोबरपासून प्रवाशांच्या सोयिनुसार मेल-एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात येत असल्याची माहिती पश्चिम व मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
मुंबई : रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार १ आॅक्टोबरपासून प्रवाशांच्या सोयिनुसार मेल-एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात येत असल्याची माहिती पश्चिम व मध्य रेल्वेकडून देण्यात आली. त्याचप्रमाणे नवीन ट्रेनही चालवण्यात येणार असून यामध्ये पश्चिम रेल्वेवर अंत्योदय, उदय, हमसफर आणि संकल्प ट्रेन तर मध्य रेल्वेवर सीएसटी ते करमाळी दरम्यान वेगवान अशी तेजस ट्रेन चालवण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर दादर ते डहाणू दरम्यान १४ डेमूऐवजी लोकल चालवण्यात येतील,अशी माहिती देण्यात आली.
मध्य रेल्वेवरील सीएसटी ते करमाळी तेजस एक्सप्रेस ही आठवड्यातून पाच दिवस धावेल. ट्रेन नंबर ११२0९ सीएसटी येथून 00.२0 वाजता सुटून करमाळी येथे ११.00 वाजता पोहोचेल. तर ट्रेन नंबर ११२१0 करमाळी येथून १२.२0 वाजता सुटून सीएसटी येथे त्याच दिवशी २२.४५ वाजता पोहोचणार आहे. ट्रेनला ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, थिविम येथे थांबा देण्यात येईल. त्याचप्रमाणे मनमाड-सीएसटी पंचवटी एक्सप्रेस ६.१0 च्या ऐवजी ६.0२ वाजता सुटेल. एलटीटी-भुवनेश्वर आणि सीएसटी ते लातूर एक्सप्रेसला ठाणे स्थानकातही थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)