‘लोकमत दीपोत्सव’ २०१४चे आज प्रकाशन
By admin | Published: October 16, 2014 05:33 AM2014-10-16T05:33:45+5:302014-10-16T05:33:45+5:30
गतवर्षी तब्बल एक लक्ष प्रतींच्या विक्रीचा टप्पा ओलांडून मराठी दिवाळी अंकांच्या शतकोत्तरी इतिहासात लोकमत समूहाच्या ‘दीपोत्सव’ने एक आगळी उंची गाठली
मुंबई: गतवर्षी तब्बल एक लक्ष प्रतींच्या विक्रीचा टप्पा ओलांडून मराठी दिवाळी अंकांच्या शतकोत्तरी इतिहासात लोकमत समूहाच्या ‘दीपोत्सव’ने एक आगळी उंची गाठली. यंदाचा बहुचर्चित दिवाळी अंक गुरुवारी (दि. १६) दुपारी मुंबईत प्रकाशित होत आहे.
मराठी नाट्यसंमेलनाच्या नियोजित अध्यक्षा फैयाज, ख्यातकीर्त चित्रकार सुहास बहुलकर, ख्यातकीर्त नेत्र शल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने, सुप्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भंडारकर, झी चोवीस तास या वृत्तवाहिनीचे संपादक उदय निरगुडकर, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आणि लोकमत माध्यम समूहाचे अध्यक्ष खा. विजय दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिराच्या पु. ल. देशपांडे कला अकादमी सभागृहात सायंकाळी चार वाजता हा सोहळा संपन्न होईल.
डिजिटल इंडियाच्या बहुचर्चित प्रकल्पाबद्दल आपली भूमिका मांडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिल गेट्स यांच्याबरोबरच्या संपन्न सहजीवनाचा प्रवास उलगडून दाखवणाऱ्या मेलिण्डा गेट्स आणि प्रथमच मुखवट्याआडचा चेहरा दिसेल, इतक्या मोकळेपणाने दिलखुलास गप्पांची मैफील रंगवणारा शाहरुख खान हे या अंकातले काही बिनीचे मानकरी आहेत.
रवींद्र नाट्यमंदिराच्या पु. ल. देशपांडे कला अकादमी सभागृहात गुरुवारी सायंकाळी चार वाजता होणाऱ्या ‘दीपोत्सव’च्या प्रकाशनाचा कार्यक्रम रसिकांसाठी खुला असून, या सोहळ्याला अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत समुहाच्यावतीने करण्यात आले
आहे. (प्रतिनिधी)