आजपासून रेडिओलॉजिस्टचा देशाव्यापी बेमुदत संप
By Admin | Published: September 1, 2016 05:46 AM2016-09-01T05:46:26+5:302016-09-01T05:46:26+5:30
देशात घटत असलेला मुलींचा जन्मदर वाढावा, म्हणून प्रसूतिपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएनडीटी) योग्य पद्धतीने वापर होत नाही.
मुंबई : देशात घटत असलेला मुलींचा जन्मदर वाढावा, म्हणून प्रसूतिपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएनडीटी) योग्य पद्धतीने वापर होत नाही. त्यामुळे कायद्याचा मूळ उद्देश सफल न होता, निर्दोष डॉक्टरांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या पाच वर्षांपासून निर्दाेष डॉक्टरांवर होणारा अन्याय थांबावा, म्हणून सरकारशी चर्चा करूनही कोणताही सकारात्मक बदल न झाल्याने देशव्यापी संप पुकारत असल्याचे इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिशनने (आयआरआयए) स्पष्ट केले. राज्यातील ४ हजार, तर मुंबईतील १ हजार २०० रेडिओलॉजिस्ट संपात सहभागी होणार आहेत.
रेडिओलॉजिस्टवर होणारा अन्याय थांबावा, म्हणून संप पुकारला असल्याचे आयआरआयएचे मुख्य समन्वयक डॉ. समीर गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या संपाला असोसिएशन आॅफ मेडिकल कन्सल्टंट, इंडियन मेडिकल असोसिएशन, असोसिएशन आॅफ फेलो गायनोकॉलॉजिस्ट आणि नवी मुंबई आॅब्स्टेट्रिक अँड गायनोकॉलॉजिस्ट सोसायटीने पाठिंबा दिला आहे.
‘मुली वाचवा’, ‘बेटी बचाव’, ‘बेटी पढाओ’ असा संदेश आम्ही प्रत्येक ठिकाणी देत असतो. गर्भलिंग निदान चाचणी करण्याचा आम्ही विरोध करतो, प्रत्यक्षात आमच्यावर अन्याय होत आहे. कायद्याचे पालन देशात एकाच पद्धतीने झाले पाहिजे. प्रत्यक्षात अधिकाऱ्यानुसार कायद्याचा अर्थ बदलतो.
त्यामुळे निर्दोष डॉक्टरांवर सरळ कारवाई होते. आरोपपत्र दाखल झाल्यावर रेडिओलॉजिस्टचे मशिन सील केले जातेच.
पण वैद्यकीय परिषदेत पत्र पाठवले जाते आणि त्या डॉक्टराची मान्यता रद्द होते, हे अत्यंत वाईट आहे. (प्रतिनिधी)
रेडिओलॉजिस्टच्या मागण्या
कारकुनी चुकांमुळे ज्या रेडिओलॉजिस्टवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांच्यावरचे आरोप काढून टाका
कारकुनी चुका झाल्यावरही ‘गर्भलिंग निदान’ केल्याचा आरोप लावण्याची कायद्यातील तरतूद बदला
प्रत्येक अधिकाऱ्याने एकाच प्रकारे कायद्याचा अर्थ लावतील, अशा तरतुदी करा