कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा, कोर्टात नेमकं काय घडलं ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 06:14 AM2017-11-29T06:14:11+5:302017-11-29T12:36:23+5:30
कोपर्डी (ता़ कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याचा बुधवारी जिल्हा न्यायालयात निकाल लागला. या प्रकरणातील तिघाही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
अहमदनगर : कोपर्डी (ता़ कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याचा बुधवारी जिल्हा न्यायालयात निकाल लागला. या प्रकरणातील तिघाही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. सकाळी 11.23 वा न्यायाधीश कोर्टरुममध्ये दाखल झाल्या. त्यानंतर निकालाच्या वाचनाला सुरुवात झाली. अवघ्या पाच मिनिटांच्या आत तीनही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. खून आणि बलात्काराच्या शिक्षेखाली तिघांनाही जन्मठेप आणि फाशीची शिक्षा झाल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.
खून आणि बलात्काराचा कट या अंतर्गत तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी एक जितेंद्र शिंदेला विनयभंग केला म्हणून तीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी एक जितेंद्र शिंदेला बलात्कार केला म्हणून जन्मठेप आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आरोपी दोन संतोष भवाळ आणि आरोपी तीन नितीन भैलुमेला बलात्काराचा कट आणि आरोपी 1 ला उद्युग्त करणे यासाठी जन्मठेप आणि 20 हजाराचा दंड ठोठावण्यात आला.
आरोपी दोन तर्फे सुनावणी तहकूब केली त्यासाठी खर्च वसूल करण्याचे आदेश दिले, तो त्याने न भरल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल म्हणून 18 हजार वसूल करावा, जर दंड भरला नाही तर आरोपीला तीन महिन्यांची साधी शिक्षा देण्यात येईल, असं कोर्टाने म्हंटलं. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही माहिती दिली आहे.