युतीसाठी चर्चेची आज दुसरी फेरी
By admin | Published: January 21, 2017 01:01 AM2017-01-21T01:01:48+5:302017-01-21T01:01:48+5:30
आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपा व शिवसेनेमध्ये युतीसाठी चर्चेची दुसरी फेरी शनिवारी दुपारी २ वाजता होणार आहे.
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपा व शिवसेनेमध्ये युतीसाठी चर्चेची दुसरी फेरी शनिवारी दुपारी २ वाजता होणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी भेटण्याचे निश्चित करण्यात आले होते; मात्र त्यामध्ये बदल होऊन शनिवारी भेटण्याचे ठरले आहे. निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी किती जागा लढवायच्या हा युतीमधील कळीचा मुद्दा असणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपा व शिवसेनेमध्ये युतीसाठी बोलणी सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजप व सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांची भेट घेऊन प्राथमिक बोलणी केली होती. त्यानंतर एकमेकांचे प्रस्ताव घेऊन पुन्हा भेटायचे ठरले होते. भाजपाकडून शहराध्यक्ष योगेश गोगावले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ व शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण यांच्यामध्ये युतीसाठी बोलणी होणार आहे.
योगेश गोगावले यांनी पक्षाच्या सर्व आमदारांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात भाजपा व शिवसेनेचे किती प्राबल्य आहे याची माहिती मागविली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मताधिक्क्यानुसार महापालिका निवडणुकीसाठी युती व्हावी, अशी भाजपाची भूमिका आहे. शिवसेनेकडूनही त्यांना किती जागा हव्या आहेत, याचा प्रस्ताव भाजपाला दिला जाणार आहे.
भाजपा व सेनेच्या युतीमुळे दोन्ही पक्षांमधील अनेकांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध होत आहे. स्वबळावर निवडणुका लढविण्याच्या तयारीने भाजपाने इतर पक्षांमधून आजी-माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला आहे. युती झाल्यास नेमक्या त्याच ठिकाणी शिवसेनेला उमेदवारी द्यावी लागणार आहे. त्यामुळे भाजपात प्रवेश केलेल्या इच्छुकांमध्ये युतीची धास्ती निर्माण झाली आहे.
>मुंबईतल्या युतीवर पुण्याची गणिते
मुंबईत शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपाने हात पुढे केला आहे. मात्र युती झाली तर ती संपूर्ण राज्यात व्हावी, अशी भूमिका शिवसेनेने स्पष्ट केली आहे. त्यामुळे पुण्यात भाजपाने शिवसेनेसोबत युतीसाठी बोलणी सुरू केली आहेत. मात्र मुंबईत युती न करण्याचा अंतिम निर्णय झाल्यास पुण्यातील शिवसेनेसोबतची बोलणी थांबविली जाईल. त्यामुळे मुंबईतल्या युतीवर पुण्यातील गणिते अवलंबून आहेत.