‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांची आज सत्त्वपरीक्षा-- साताºयात शेतकरी मेळावा-आगामी वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 10:56 PM2017-09-08T22:56:39+5:302017-09-08T22:59:02+5:30
सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन नेते सदाभाऊ खोत यांना घराबाहेर काढल्यानंतर मूळच्या स्वाभिमानीत कोण राहिलयं, खोत यांच्यासोबत कोण निघून गेलयं, याची खबरबात
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन नेते सदाभाऊ खोत यांना घराबाहेर काढल्यानंतर मूळच्या स्वाभिमानीत कोण राहिलयं, खोत यांच्यासोबत कोण निघून गेलयं, याची खबरबात शुक्रवारी साताºयात होणाºया शेतकरी मेळाव्यातच लागणार आहे. त्यामुळे खासदार राजू शेट्टी यांना मानणाºया कार्यकर्त्यांची आज परीक्षा पाहायला मिळेल.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाºयांच्यावतीने साताºयातील वाढे फाटा येथील एका कार्यालयात शुक्रवार, दि. ९ रोजी दुपारी एक वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात खासदार राजू शेट्टी हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. सरकार स्थापनेवेळी असलेली भूमिका आणि सरकारमधून बाहेर पडल्यानंतरची भूमिका याबाबत खासदार शेट्टी या मेळाव्यात सविस्तर विवेचन करण्याची शक्यता आहे. किंबहुना त्याची उत्सुकता जिल्ह्यातील शेतकºयांनाही आहे.
खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांना मानणारी मंडळी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. खोत हे सरकारमध्ये सामील असल्याने त्यांच्यावर विसंबून असलेली मंडळी सध्या द्विधा अवस्थेत आहेत. खोत यांच्यासोबत जावे तर खासदार राजू शेट्टींची नाराजी ओढवेल आणि खासदार शेट्टींसोबत राहावे तर सरकारच्या माध्यमातून मिळणारे लाभ बंद होतील, अशा द्विधावस्थेत काहीजण आहेत. स्वाभिमानीत ज्या पद्धतीने मंत्री खोत यांना शेतकºयांचा पाठिंबा मिळाला, तसाच आता स्वतंत्र संघटना स्थापन केल्यानंतर मिळेल का?, असा अंदाज बांधण्याचे काम काही मंडळी करीत आहेत.
खासदार राजू शेट्टी यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचे मोठे धाडस केले आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे सदाभाऊ खोत आता त्यांच्यासोबत नाहीत. साहजिकच खोत यांना पर्याय शोधण्याचे प्रयत्न खासदार शेट्टींकडून सुरू आहेत. विदर्भ, मराठवाड्यात रविकांत तूपकर यांच्या रूपाने शेट्टींच्या गोटात लढवय्या मावळा असला तरी पश्चिम महाराष्ट्रात अद्याप नेतृत्वाची पोकळी जाणवत आहे. ती भरून काढण्याचा शोध खासदार शेट्टी या मेळाव्यात घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, खासदार शेट्टींची सभा आणि गर्दी हे समीकरण कायमच पाहायला मिळत आले आहे. आता साताºयातील मेळाव्याच्या तयारीसाठी जिल्हाध्यक्ष अर्जुन साळुंखे, देवानंद पाटील, राजू शेळके, अलिभाई इनामदार, ज्ञानदेव कदम, जीवन शिर्के, युवा आघाडीचे धनंजय महामूलकर, नितीन यादव, सूर्यकांत भुजबळ या मंडळींनी जोरदार तयारी केली होती. या तयारीची फलनिष्पत्ती शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने दिसून येणार आहे. या मेळाव्याला गर्दी जमली तर मूळच्या ‘स्वाभिमानी’च्या प्रवाहाचे मोजमाप करता येणार आहे.
कर्जमाफीच्या आंदोलनानंतर खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात मोठी दरी निर्माण झाली. दोघांनीही एकमेकांवर चांगलेच तोंडसूख घेतले होते. साताºयात होणाºया मेळाव्यातही खोत यांच्यावर टीका टिप्पणी होणार, हे जरी ठरलेले असले तरी खोत यांना बाजूला करण्याचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न मेळाव्याला जमलेल्या शेतकºयांमधून होणार आहे.
खोत यांच्या मसुदा समितीत भगत
मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीला रामराम ठोकल्यानंतर नवीन संघटना स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यासाठी १६ कार्यकर्त्यांची मसुदा समिती स्थापन केली आहे. त्याच्या अध्यक्षपदी संजय भगत यांची नियुक्ती केली आहे. १५ सप्टेंबर रोजी पुण्याला मसुदा समिती बैठक होणार आहे. २० तारखेपर्यंत संघटनेचा मसुदा अंतिम करण्यात येणार असून, २१ तारखेला घटस्थापनेच्या मुहूर्तावर कोल्हापुरात मंत्री सदाभाऊ खोत नवीन संघटनेची घोषणा करणार आहेत.