पुणे शहराच्या नव्या महापौर, उपमहापौरांची आज निवड

By admin | Published: March 15, 2017 03:43 AM2017-03-15T03:43:19+5:302017-03-15T03:43:19+5:30

महापालिकेच्या १३व्या सभागृहाच्या ५६व्या महापौरपदाची व उपमहापौरपदाची बुधवारी (दि. १५) निवडणूक होत आहे. महापालिकेच्या छत्रपती शिवाजीमहाराज सभागृहात सकाळी

Today's selection of the new Mayor, Deputy Mayor of Pune City | पुणे शहराच्या नव्या महापौर, उपमहापौरांची आज निवड

पुणे शहराच्या नव्या महापौर, उपमहापौरांची आज निवड

Next

पुणे : महापालिकेच्या १३व्या सभागृहाच्या ५६व्या महापौरपदाची व उपमहापौरपदाची बुधवारी (दि. १५) निवडणूक होत आहे. महापालिकेच्या छत्रपती शिवाजीमहाराज सभागृहात सकाळी साडेअकरा वाजता होणाऱ्या या निवडणुकीसाठी महापौरपदासाठी भाजपाच्या मुक्ता टिळक, शिवसेनेच्या संगीता ठोसर व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नंदा लोणकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. उपमहापौरपदासाठी भाजपा-आरपीआयचे नवनाथ कांबळे, शिवसेनेचे विशाल धनवडे व आघाडीच्या लता राजगुरू रिंगणात आहेत. बहुमतामुळे भाजपाच्या उमेदवारांच्या निवडीची औपचारिक घोषणा होणेच बाकी आहे.
जिल्हाधिकारी सौरभ राव हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीचे पंधरा मिनिटे अर्ज माघारीसाठी देण्यात येणार आहेत. त्यानंतर या निवडणुकीसाठी हात वर करून मतदान होणार आहे. महापौरपदाची निवड झाल्यानंतर नव्या महापौरांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौर पदाची निवडणूक होईल. त्यासाठीचे मतदानही हात वर करूनच होणार आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांची ही पहिलीच सभा आहे. त्यातही महापालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात भाजपाला प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे सदस्य व अन्य पक्षांचेही सदस्य पहिलेपणामुळे उत्सवी व उत्साही वातावरणात सभेला उपस्थित राहतील.
पालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. १६२ सदस्यांपैकी त्यांचे ९८ सदस्य आहेत. त्यामुळेच महापौरपदासाठीच्या त्यांच्या उमेदवार मुक्ता टिळक व उपमहापौरपदासाठीचे नवनाथ कांबळे यांच्या निवडीची फक्त औपचारिकताच बाकी आहे. काँग्रेसचे ९ व राष्ट्रवादीचे ३९ सदस्य आहेत. शिवसेनेचे फक्त १० सदस्य आहेत. तरीही निवडणूक अविरोध होऊ द्यायची नसल्यानेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने व शिवसेनेने आपले स्वतंत्र उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. पक्षाच्या नेत्यांमध्ये काही चर्चा झाली तर ऐन वेळी आघाडीचे तसेच शिवसेनेचे उमेदवार त्यांचे अर्ज मागे घेण्याचीही शक्यता आहे.
महापालिकेची स्थापना १९५० मध्ये झाली. त्यानंतरचे बुधवारी अस्तित्वात येणारे सभागृह १३वे सभागृह आहे. महापौरपदी येणारी व्यक्ती पुणे शहराची ५६वी महापौर असेल. मुक्ता टिळक यांची निवड झाल्यानंतर त्या पुण्याच्या ९व्या महिला महापौर असतील. नवनाथ कांबळे यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून रिपाइंलाही महापालिकेच्या इतिहासात प्रथमच उपमहापौरपद मिळणार
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today's selection of the new Mayor, Deputy Mayor of Pune City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.