चंद्रदर्शनाचा आज तिहेरी योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 05:28 AM2018-01-31T05:28:41+5:302018-01-31T05:28:57+5:30
बुधवारी खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून यांचे साध्या डोळ्यांनी रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात दर्शन होणार असल्याचे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
मुंबई : बुधवारी खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून यांचे साध्या डोळ्यांनी रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात दर्शन होणार असल्याचे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. १५२ वर्षांपूर्वी ३१ मार्च १८६६ रोजी चंद्रग्रहण, ब्ल्यूमून आणि सुपरमून दर्शनाचा योग आला होता. ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्या वेळी त्याला सुपरमून म्हणतात. बुधवारी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५९ हजार किलोमीटर अंतरावर येणार आहे. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने त्या दिवशी पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाराने मोठे दिसणार आहे. या वेळी २ जानेवारी आणि ३१ जानेवारी अशा दोन पौर्णिमा आल्याने ३१ जानेवारीच्या चंद्रास ब्ल्यूमून म्हटलेले आहे.
३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. सायंकाळी ६ वाजून २१ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीस प्रारंभ होईल. सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी पूर्व क्षितिजावर खग्रास स्थितीमध्ये चंद्रोदय होईल आणि सुपर-ब्ल्यू-ब्लडमूनचे दर्शन होईल. ग्रहणमध्य सायंकाळी सात वाजता आहे. खग्रास स्थिती समाप्ती सायंकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी होईल आणि रात्री ८ वाजून ४२ मिनिटांनी ग्रहण सुटेल. दरम्यान, २६ मे २०२१ रोजी सुपरमून आणि चंद्रग्रहण असा योग येईल. ३१ डिसेंबर २०२८ रोजी ब्ल्यूमून आणि चंद्रग्रहण असा योग येईल. ३१ जानेवारी २०३७ रोजी पुन्हा तिहेरी योग आल्याने सुपर-ब्ल्यू-ब्लड मूनचे दर्शन घेता येईल.
विशेष सुपर-ब्ल्यू-ब्लड मून दुर्बिणीतून बघण्याकरिता खगोल मंडळातर्फे सायंकाळी ६.३० पासून रात्री ८.३० पर्यंत दादर पश्चिमेकडील शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दुर्बीण लावण्यात येणार आहे. सर्व मुंबईकरांनी ही अवकाश घटना प्रत्यक्ष पाहावी, असे आवाहन खगोल मंडळाचे मिलिंद कांबळे यांनी केले आहे.