आजचा दिवस मतदाराचा!

By admin | Published: October 15, 2014 01:13 AM2014-10-15T01:13:57+5:302014-10-15T08:45:19+5:30

मतदानाच्या हक्कापासून वंचित असलेल्या जगभरातल्या असंख्य लोकांना विचारा, म्हणजे कळेल मतदानाचे माहात्म्य. आपल्यालाही मतदानाचा हक्क स्वस्तात मिळालेला नाही. या हक्काचे बोट धरून कर्तव्यही येते

Today's voter! | आजचा दिवस मतदाराचा!

आजचा दिवस मतदाराचा!

Next

मतदानाच्या हक्कापासून वंचित असलेल्या जगभरातल्या असंख्य लोकांना विचारा, म्हणजे कळेल मतदानाचे माहात्म्य. आपल्यालाही मतदानाचा हक्क स्वस्तात मिळालेला नाही. या हक्काचे बोट धरून कर्तव्यही येते. अधिकार, कर्तव्य आणि हक्क एकाचवेळी बजावण्याची संधी तुम्हा-आम्हा प्रत्येक ‘प्रौढा’ला लोकशाहीच्या विशाल रंगमंचावर देणारा सोहळा म्हणजे निवडणूक. या निवडणुकांमध्ये पडणारे प्रत्येक मत लाखमोलाचे...खरे तर अमूल्यच! माझ्या एका मताने काय फरक पडणार, ही उदासीनता झटकून माझे एक मत परिस्थिती बदलवून टाकेल, या विश्वासाने मतदान करण्याची आणखी एक संधी चालून आली आहे. सुदृढ लोकशाहीला दृष्ट लागू नये, यासाठी प्रत्येक मतदाराने बोटाला तीट लावून घेण्याचा दिवस उगवला आहे. चला तर मतदानाचा हक्क बजावू या...आपल्याच भल्यासाठी! आपल्या ओळखीचे सगळे सुप्रसिद्ध चेहरेही तेच तर सांगताहेत...

जावेद अख्तर : लोकसभा निवडणुकीच्या वेळेस अमेरिकेत आयफा पुरस्कार घोषित झाले होते. शबाना तिच्या मिझवां गावात एका एनजीओसाठी काम करते. तेथील महिलांकडून तिने चिकन साड्या विणून घेतल्या होत्या; आणि त्या साड्यांचा आयफामध्ये लिलाव व्हायचा होता. हे काम त्या गरीब महिलांच्या पुनरुत्थानाच्या दृष्टिकोनातून अधिक महत्त्वाचे होते. म्हणून मला आणि शबानाला आयफासाठी अमेरिकेत मतदान सोडून जावे लागले. अशा पार्श्वभूमीवर मी आज महाराष्ट्रातील जनतेला मतदानासाठी कळकळीचे आवाहन करतोय मतदानाचा हक्क बजावून योग्य उमेदवार निवडून द्या.

अनुपम खेर : मतदानाचा दिवस कधी येतो याची मी आतुरतेने वाट पाहत असतो. देशाचा नागरिक असल्याने हे कर्तव्य पार पाडणे सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. चांगले सरकार निवडून देण्याचा आपला हक्क आपण बजावलाच पाहिजे. त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने घरातून बाहेर पडून आज मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करतो.

विद्या बालन : राजकारणात मला फारसा रस नसला तरी मतदान करणे आवश्यकच आहे, असे मी मानते. सरकारबाबतीत लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. त्यांची उत्तरे त्यांना मिळतात असे नाही. अशावेळी आपले प्रश्न सोडवू शकणारा, जाणून घेणारा उमेदवार कोण याची योग्य खातरजमा करून मतदान करा आणि आपला नेता निवडा. लोक ती जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडतील, याची खात्री वाटते.

ऋचा चढ्ढा : मतदानाचा अधिकार सर्वांनी बजावणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आपण आपले भविष्य कोणाच्या हाती देतो ते ठरवत असतो. मी एवढेच सांगेन की, सर्वांनी डोळसपणे मतदान करावे.

हुमा कुरेशी : आज मतदानाचा दिवस आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने या लोकशाहीच्या कार्यात सामील व्हा, असे मी आवाहन करते. आपल्या योग्य मतदानामुळे उद्या खूप मोठा चांगला बदल घडू शकतो, याचे भान ठेवून मतदान करावे. मतदान हा आपला अधिकार आहे आणि जबाबदारीही.

अजय देवगण : प्रश्न जेव्हा माझ्या देशाच्या-राज्याच्या सार्वभौमत्वाचा येतो,तेव्हा तो माझ्यासाठी सर्वस्वी माझा बनतो. गेली अनेक वर्षे मुंबईत राहून मला जाणवलंय्, टीका करण्यात आपण सगळेच आघाडीवर असतो,पण मतदानात मागे का़? मतदानाचं कर्तव्य पार पाडा मग  टीका करा..पण, मतदानाच्या कर्तव्यात चूकू नका.

सुनील शेट्टी : मतदान करणे ही मोलाची जबाबदारी आहे. त्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. आपल्या लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा दिवस हा एखाद्या उत्सवासारखा असतो. कामात कितीही व्यस्त असलो तरी मतदानाच्या दिवशी कोणतेही काम न घेता आपला हक्क एवढे वर्ष मी बजावत आलो आहे. त्यामुळेच जबाबदारीने मतदान करून योग्य उमेदवार निवडा असे मी लोकांना आवाहन करतो.

जॅकी श्रॉफ : मतदान केल्याने खूप मोठा फरक पडू शकतो. भविष्यात आपल्याला आपल्या गरजा पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल, तसेच महाराष्ट्राचीही भरभराट व्हावी अशी इच्छा असेल तर त्याप्रमाणे योग्य उमेदवाराला मत देण्याचा आजचा दिवस आहे. प्रत्येकांनी मतदान हे केलेच पाहिजे. आजच्या दिवशी भरघोस मतदान व्हावे, अशी मी अपेक्षा करतो.

फरहा खान : मतदान करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळेच शुटींगमध्ये कितीही बिझी असले तरी मतदानाच्या दिवशी मतदान करणे चुकविलेले नाही. पाच वर्षातून एकदा ही संधी मिळत असल्याने त्याचा पुरेपूर उपयोग करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने आज मतदान करावे असे मी आवाहन करते.

अक्षयकुमार: मी दिल्लीत जन्मलो. पण, माझं बस्तान इथे पूर्णत: बसण्यापूर्वीच मी माझे रेशनिंग कार्ड तातडीने बनवून घेतलं. मला मुंबईत ओळखपत्र मिळाल्याचा खूप आनंद झाला,आणि त्यानंतर कधीही मी मतदान चुकवले नाही,तुम्ही देखील चुकवणार नाही याची खात्री बाळगतो.

शिवाजी साटम : महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी माझे मत वापरणार आहे. माझे तुम्हा सर्वांना कळकळीचे आवाहन आहे, की तुम्हीही मतदानाचा हक्क बजावा. तो आपला हक्ही आहे आणि कर्तव्यही आहे.

अतुल कुलकर्णी : या देशात राहण्याचा अधिकार हवा असेल, तर मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे.

रोहिणी हट्टंगडी : मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे, या भूमिकेतून मी मतदान करणार आहे. तुम्हीही करा. मुख्य म्हणजे माझ्या एका मताने काय फरक पडणार?ही निराशावादी मानसिकता बदलायला हवी. चांगल्या माणसांना निवडून देण्याची जबाबदारी पार पाडायची तर तुमच्या एका मताने फरक पडू शकतो. आपल्या एका मताने फरक पडणार आहे, या विश्वासाने मतदान कराच.

अमोल कोल्हे : मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे.

राही सरनोबत : लोकशाही मजबूत आणि कार्यक्षम बनविण्यासाठी सुशिक्षित आणि दुरदृष्टी असणाऱ्या उमेदवाराला मतदान करा. आपले मतदान राज्याचे भविष्य घडविणार आहे.

धनराज पिल्ले : मतदान करत नसाल, तर तुम्हाला दुसऱ्यांवर टीका करण्याचा कोणताच अधिकार नाही. आधी मतदान करून स्वत:ची जबाबदारी पार पाडा

.
नंदू माधव : मतदान हा नागरिकांचा अधिकार तर आहेच; पण त्याचबरोबर ती जबाबदारीही आहे आणि ती पूर्ण करणे गरजेचे आहे. आता तर पंचरंगी निवडणूक होत आहे. मतदारांनी अवश्य मतदान करावे. नोटा चाही पर्याय उपलब्ध आहेच.

सुनिधी चौहान : मी मुंबईत आले तेव्हां माझं वय लहान होतं, माझं ओळखपत्र बनलं आणि मतदान केलं तेव्हा अपार आनंद झाला,कारण हा देश-राज्य माझं होतं,मी मला हव्या त्या प्रतिनिधीला निवडून दिल्याचा आनंदही झाला.

Web Title: Today's voter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.