महापालिकेसाठी एकत्र या -पवार
By admin | Published: June 20, 2016 04:13 AM2016-06-20T04:13:47+5:302016-06-20T04:13:47+5:30
पनवेल महानगरपालिका होत आहे. त्यामुळे शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लोकांच्या भल्यासाठी एकत्र यावे
पनवेल : पनवेल महानगरपालिका होत आहे. त्यामुळे शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लोकांच्या भल्यासाठी एकत्र यावे, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पनवेल येथे केली. शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
‘देशात स्वातंत्र्यानंतर कधीही आले नाहीत, असे दिवस येणार असल्याची बतावणी करण्यात आली होती. मात्र, आता केरळ, पश्चिम बंगालमध्ये काय झाले? या राज्यांतल्या निकालानंतर लोकांना खरी प्रचिती आली,’ अशी टीका पवार यांनी केली. ‘सिडकोचा साडेबारा टक्केचा लढा असो किंवा जेएनपीटीमधले प्रश्न असोत, सर्वच लढ्यांत विवेक पाटील यांचा सहभाग मोलाचा होता. त्यांनी स्थापन केलेल्या कर्नाळा स्पोर्ट्समधील आयोनिका पॉलची निवड रियो आॅलिम्पिकसाठी झालेली आहे. शूटिंगमध्ये ती नक्कीच सुवर्णपदक मिळवेल,’ असा विश्वास पवार यांनी या वेळी व्यक्त केला. कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीत झालेल्या या सोहळ्याला काँग्रेसचे नेते पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)