नवरीसोबत थर्माकोलचे शौचालयही!
By admin | Published: July 12, 2015 09:53 PM2015-07-12T21:53:11+5:302015-07-12T21:53:11+5:30
लोधवडेच्या सुपुत्राचा उपक्रम : निर्मल ग्राम अभियानाला कृतीची जोड
सचिन मंगरुळे - म्हसवड -मुलगी सासरी निघाली की तिला सर्व संसारोपयोगी साहित्य भेट देण्याची आपल्याकडे प्रथा आहे. मात्र, जमाना बदलला आहे. आता ज्या घरी शौचालय नाही, अशा स्थळाला मुली नकार देतात. या पार्श्वभूमीवर आणि निर्मलग्राम स्वच्छ भारत अभियानाला हातभार लागावा, या हेतूने माण तालुक्यातील लोधवडे येथील उद्योजक रामदास माने नववधूंना थर्माकोलची शौचालय मोफत भेट देणार आहेत.निर्मल ग्राम अभियान खेड्यापाड्यांत पोहोचावे, यासाठी शासनाकडून जनजागृती केली जाते. त्याला कृतीची जोड देण्यासाठी लोधवडे गावचे सुपुत्र व पुणे येथील उद्योजक रामदास माने यांनी नववधूंसाठी मोफत शौचालय, हा उपक्रम हाती घेतला आहे.
शौचालयाचे महत्त्व पटल्यामुळे अनेक महिलांनी प्रसंगी आपले मंगळसूत्र गहाण ठेवून शौचालय बांधून घेतले. तर अनेक मुली लग्नाअगोदर सासरी शौचालय बांधण्याची अट घालतात. मात्र, नववधूला शौचालय भेट देण्याचा माने यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे. माने यांचा थर्माकोल निर्मितीचा व्यवसाय आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील खेड्यांमध्ये २० हजारांहून जास्त शौचालये सवलतीच्या दरात वितरीत केली आहेत.