शौचालय वापराचे प्रमाणपत्र अनिवार्य
By Admin | Published: January 20, 2017 12:12 AM2017-01-20T00:12:45+5:302017-01-20T00:12:45+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढवायची असेल, तर उमेदवारांना शौचालय वापरत आहे
श्यामकुमार पुरे,
सिल्लोड (जि. औरंगाबाद)- जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढवायची असेल, तर उमेदवारांना शौचालय वापरत आहे, असे प्रमाणपत्र उमेदवारी अर्ज भरताना द्यावे लागणार आहे. अन्यथा संबंधित उमेदवार अपात्र ठरणार आहे.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची या नव्या नियमामुळे मोठी फजिती झाली आहे. शौचालय वापरत असल्याचे प्रमाणपत्र देऊन चालणार नाही, तर उमेदवारांना यासंबंधी ग्रामसभेचा ठरावही द्यावा लागणार आहे. आता आचारसंहितेमुळे ग्रामसभाही घेता येत नाही. त्यामुळे अनेकांनी ग्रामसभेच्या इतिवृत्तात खाडाखोड करून प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धावपळ सुरू आहे. इच्छुक उमेदवाराच्या घरामध्ये शौचालय आहे व त्याचा वापर केला जात आहे, असे ग्रामसेवकांकडून प्रमाणपत्र घेऊन ते उमेदवारी अर्जासोबत देणे अनिवार्य आहे.
एखाद्याने आक्षेप घेतला आणि संबंधित उमेदवाराने शौचालय वापरत असल्याचे प्रमाणपत्र सादर केलेले नसेल, तर तो उमेदवार निवडणूक लढण्यास अपात्र ठरू शकतो, अशी माहिती तहसीलदार संतोष गोरड यांनी दिली.