शौचालयांची बांधकामे रखडली!
By Admin | Published: November 7, 2016 06:13 AM2016-11-07T06:13:39+5:302016-11-07T06:13:39+5:30
शहर, गाव, खेडे आदींमध्ये लोकचळवळ ठरलेली हागणदारी मुक्ती व त्यामुळे उभ्या राहिलेल्या शौचालयाचा लाभ ठाणे जिल्ह्यातील सुमारे १९ प्राथमिक शाळांना अद्यापही झाला नाही
ठाणे : शहर, गाव, खेडे आदींमध्ये लोकचळवळ ठरलेली हागणदारी मुक्ती व त्यामुळे उभ्या राहिलेल्या शौचालयाचा लाभ ठाणे जिल्ह्यातील सुमारे १९ प्राथमिक शाळांना अद्यापही झाला नाही. त्यासाठी सर्व शिक्षा अभियानाव्दारे निधी मंजूर असतानाही बांधकामे अद्यापही रखडलेली असल्याचे प्राप्त अहवालावरून उघड झाले आहे.
शहराप्रमाणेच गावखेड्यातील विद्यार्थ्यांच्या शाळेचा परिसर स्वच्छ व्हावा, त्यांना वेगवेगळ्या सोयी-सुविधा असाव्यात, त्यातून विद्यार्थ्यांना प्रसन्नता मिळावी म्हणून परिसर स्वच्छता, शाळेची रंगरंगोटी, डागडूजी करण्यासह विविध सोयी, सुविधांच्या पूर्ततेसाठी मोठा निधी सर्व शिक्षा अभियानाव्दारे मंजूर झाला आहे. आवश्यकता भासल्यास नवीन वर्ग खोल्यांच्या बांधकामांसाठीदेखील निधी मंजूर आहे. त्यात या शौचालयांच्या बांधकामांचादेखील समावेश आहे. ती अद्यापही पूर्ण न झाल्यामुळे विद्यार्थी -विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे. दिवाळीच्या सुटीत तरी ही कामे पूर्ण होण्याची अपेक्षा जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
हागणदारी मुक्ती व शौचालयाची सक्ती करून घरोघर निधी देखील दिला जातोय. विद्यार्थ्यांनी जनजागृतीव्दारे या कार्यक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप दिले. यानुसार प्रत्येक शाळेसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शाळेचा स्वच्छ परिसरत आणि शौचालये व मुतारीची सक्ती केली आहे. या करिता ठाणे जिल्हा परिषदेच्या १९ प्राथमिक शाळांसाठी खास निधीदेखील मंजूर आहे; पण त्याकडे दुर्लक्ष करून या शाळांच्या रेंगाळलेल्या शौचालयांची कामे अद्यापही हाती घेतले नसल्याचे खासदारांच्या दिशा समितीच्या बैठकीव्दारे उघड झाले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या नऊ तर विद्यार्थिनींच्या १० शौचालयांचा समावेश आहे.
या शालेय शौचालयांसाठी १५ लाख ७७ हजार रूपयांचा निधी मंजूर आहे. या मंजूर रकमेतून अद्यापपर्यंत अंबरनाथ तालुक्यातील राहटोळी, वांगणी, भिनारपाड येथील शाळांसह भिवंडीच्या बापगांव, मनीचापाड, वरेत, पछापूर, नेवाडे या शाळांचे शौचालये बांधले नाहीत. याप्रमाणेच कल्याण तालुक्यातील खडवली शाळेसह मुरबाड तालुक्यातील वाडाचीवाडी, फांगूळगवान, सुकळवाडी येथील शौचालये बांधलेले नाही. (प्रतिनिधी)