दिंडीत स्वखर्चाने फिरते शौचालय

By Admin | Published: July 19, 2015 10:59 PM2015-07-19T22:59:27+5:302015-07-20T00:05:11+5:30

कोल्हापूरच्या तरुणाचा उपक्रम : जलशुद्धिकरण, सौरऊर्जेची यंत्रणाही

Toilets run round the clock | दिंडीत स्वखर्चाने फिरते शौचालय

दिंडीत स्वखर्चाने फिरते शौचालय

googlenewsNext

वीरकुमार पाटील - कोल्हापूर -पंढरपूरच्या वारीमार्गावर वारकऱ्यांच्या नैसर्गिक विधीमुळे होणारी अस्वच्छता टाळण्यासाठी दिंडीत स्वखर्चाने फिरते शौचालय नेण्याचा उप्रकम कसबा सांगाव (ता. कागल) येथील एका तरुण वारकऱ्याने सुरू केला आहे. शिवाय शौचालय असलेल्या या मोटारीत जल शुद्धीकरण, सौर ऊर्जेच्या यंत्रणेसह मोबाईल चार्जिंगचीही सोय केली आहे. ‘स्वच्छ वारी-सुंदर वारी’चा संदेशही तो देत आहे. तानाजी आप्पासो माळी असे त्याचे नाव आहे.
तानाजी माळी यांचे कुटुंबच विठ्ठलभक्त. त्यांची आई दरवर्षी गावच्या दिंडीत सहभागी होत असते. गेल्या चार वर्षांपासून तानाजीही दिंडीतून वारीला जाऊ लागले. दिंडी जेथे थांबते तेथे वारकऱ्यांमुळे होणारी अस्वच्छता पाहून ते अस्वस्थ होत. यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, असा निश्चय त्यांनी केला. त्यासाठी मॅक्झीमो कंपनीचे चारचाकी वाहन त्यांनी तीन महिन्यांपूर्वी खरेदी केले. या वाहनातच वारकऱ्यांसाठी शौचालय उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पत्नीला ही कल्पना सांगितली तेव्हा तिने सुरुवातीला विरोध केला, पण तिची समजूत काढली.
शौचालयासाठी त्यांनी लोखंडी पट्ट्यांच्या वापर करून गाडीच्या हौदात सोय केली आहे. जेथे प्रात:र्विधी करायचा आहे तेथे त्यांनी दोन अडीच फूट रूंदीची रबराची पट्टी वापरली आहे. मलमुत्र साठविण्यासाठी गाडीच्या मागे साधारण शंभर लिटरची प्लास्टिकची टाकी ठेवलेली आहे. प्रवासादरम्यान त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले आहे. पुरुष आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र दोन शौचालय या गाडीत आहेत. माळी यांच्या या उपक्रमामुळे दिंडीतील वारकऱ्यांमुळे कुठेही अस्वच्छता होणार नाही. ही गाडी ज्या दिंडीबरोबर आहे त्या कसबा सांगावातील दिंंडीत साधारण शंभर वारकरी आहेत. तानाजी माळी यांनी सांगितले की, पंढरपूरपर्यंत या सर्व वारकऱ्यांना या यांत्रिक शौचालयाचा वापर करता येणार असून, पंढरपूरमध्ये शक्य होईल तेवढ्यांना याचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. गाडीच्या चारही बाजूला आडोसा म्हणून डिजीटल फलक लावले आहेत. या फलकावर ‘पाणी वाचवा, सौरउर्जेचा वापर करा आणि वीज वाचवा, स्वच्छता, बनाओ शौचालय -अपनाओ शौचालय’ असा संदेश दिला आहे. सोलरच्या साहाय्याने मोबाईल चार्चिंगचीही सोय केली आहे. माळी यांना ही यंत्रणा उभारण्यासाठी अंदाजे २० हजार रुपये खर्च आला आहे.

वारकऱ्यांमुळे दिंडीमार्गावरील नैसर्गिक विधीमुळे अस्वच्छता निर्माण होते हे वास्तव आहे. त्याचा अनुभव मी घेतला आहे. त्यामुळे स्वच्छतेसाठी शौचालयाची सोय करावी आणि रोगराई टळावी या हेतूने फिरते शौचालय निर्माण केले आहे. वारकऱ्यांच्या सेवेतूनही पांडुरंग पावतो अशी माझी श्रद्धा आहे.
- तानाजी माळी, कसबा सांगाव.

Web Title: Toilets run round the clock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.