टोलनाकाबंदीचा ठाण्यात जल्लोष!
By admin | Published: May 15, 2017 06:31 AM2017-05-15T06:31:16+5:302017-05-15T06:31:16+5:30
मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाण्यातील खारेगाव टोलनाका हा राज्यातील पहिला बंद होणारा टोलनाका ठरला आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाण्यातील खारेगाव टोलनाका हा राज्यातील पहिला बंद होणारा टोलनाका ठरला आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून बंद झालेल्या या टोलनाक्यावर राजकीय संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. येथून जाणाऱ्या वाहनचालकांना मिठाई देत, त्यांचे तोंडही गोड केले. गुलाबाची फुले देऊन त्यांना शुभेच्छाही दिल्या. रविवारी या टोलनाक्यावरील केबिन्स कर्मचाऱ्यांविना रिकाम्या पडल्याचे चित्र होते.
मुंबईहून नाशिककडे जाताना ठाणे शहरातील खारेगाव टोलनाक्यावरून दिवसभरात हजारो वाहने ये-जा करतात. या रस्त्यावर १९९८ मध्ये उभारण्यात आलेल्या या टोलनाक्याच्या वसुलीतून आयआरबी कंपनीला दिवसाला लाखो रुपयांचा टोल आजतागायत मिळत होता. मात्र, सरकारच्या आदेशानंतर टोलनाका बंद करण्याची लगबग कंपनीकडून सुरू झाल्याने सुरुवातीला या टोलनाक्याच्या प्रत्येक लेनवर हा टोलनाका कायमचा बंद होत असल्याचे फलक लावण्यात आले. त्याचसोबतच टोलनाक्याच्या अधिकाऱ्यांनी येथील १४ टोलवसुलीच्या चौक्यांना टाळे ठोक ले.
या रस्ता उभारणीचा आणि देखभाल दुरु स्तीचा १८० कोटी रु पयांचा खर्च टोलच्या माध्यमातून वसूल झाल्यामुळे हा टोलनाका बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यानुसार हा टोलनाका बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मध्यरात्री आनंदोत्सव साजरा करण्यासाठी शिवसेनाप्रणीत ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघाचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास तावडे आदींनी धाव घेतली होती.