महाराष्ट्रातील सर्व टोलनाक्यांवर 11 नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद
By admin | Published: November 9, 2016 07:47 PM2016-11-09T19:47:08+5:302016-11-09T19:47:08+5:30
राज्यातील टोल नाक्यांवर 11 नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती सुरळीत होऊन जनतेला दिलासा मिळावा, यासाठी राज्यातील टोल नाक्यांवर 11 नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा रद्द करण्याची घोषणा मंगळवारी (दि.8) केल्यानंतर सर्वत्र नागरिकांनी एकच तारांबळ उडताना दिसत आहे. विशेष म्हणजे, टोलनाक्यांवर सुट्टे पैसे उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. यामुळे राज्य सरकारने टोल नाक्यांवर 11 नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य वाहनचालकांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे.
11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर टोलवसुली करण्यात येणार नसल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील सर्व टोलनाक्यांवर टोल आकारणी करण्यात येणार नसल्याचे सांगितले.
याचबरोबर सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यासंदर्भात केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती सुरळीत होऊन जनतेला दिलासा मिळावा. यासाठी राज्यातील टोल नाक्यांवर 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोल आकारणी न करण्याची घोषणा मा. मुख्यमंत्र्यांनी केली असून एमएसआरडीसीच्या टोल कंत्राटदारांना त्याबाबतचे निर्देश देण्यात आल्याचे ते म्हणाले.
It has been decided to suspend Toll across all National Highways till midnight of 11th November to facilitate smooth traffic movement
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 9, 2016