शिंदे सरकार येताच सिंधुदुर्ग, रत्नागिरीत टोलधाड; पोलिस संरक्षणात वसुलीचे आदेश निघाले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 11:59 PM2022-07-01T23:59:20+5:302022-07-02T00:03:05+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओसरगाव तर रत्नागिरी जिल्ह्यात हातीवले टोलनाक्यावर टोलवसुलीचे आदेश; तत्काळ टोलवसुली आदेश निघण्यामागे नेमके कोण? नागरिकांचा प्रश्न
लोकमत न्यूज नेटवर्क
कणकवली: मुंबई -गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव व रत्नागिरी जिल्ह्यातील हातीवले या दोन्ही टोलनाक्यावर टोलवसुली करण्याचे आदेश संबंधितांना मिळाले आहेत. पोलीस संरक्षणात टोलवसुली करण्याचे निर्देश महामार्ग प्राधिकरणचे कोल्हापूर येथील डिजीएम तथा प्रोजेक्ट डायरेक्टर व्ही. डी. पंदरकर यांनी टोल ठेकेदार करीमुन्नीसा कंपनीला दिले आहेत.
सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना टोलमुक्ती मिळावी, अशी मागणी सर्वपक्षीय, नागरिकांची असताना हा आदेश देण्यामागे नेमके कोण आहे ?असा प्रश्न नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे. खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यासह सर्वपक्षीय पदाधिकारी आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात सत्ताबदल होताच आणि शिंदे गटासह भाजपा सरकार येताच रखडलेली टोलवसुली पोलीस संरक्षणात करण्याचे आदेश निघाले आहेत. त्यामागे कुठल्या नेत्याचा हात आहे? सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात टोलवसुली सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे लेखी आदेश देखील २९ जून, २०२२ रोजी महामार्ग प्राधिकरणने काढल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टोलविरोधी आंदोलन दडपण्याची शक्यता आहे.
ओसरगाव टोलनाक्यावरील टोलवसुली चाचणीला सर्वपक्षीयानी विरोध केला होता. एम.एच. ०७ सह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पासिंग झालेल्या सर्व वाहनांना टोलमुक्ती मिळायलाच हवी, महामार्ग भूसंपादन मोबदला तत्काळ मिळावा, ओसरगाव टोलनाक्यावर वाहनचालकांना रेस्ट रूम, सार्वजनिक स्वछतागृह नाही तसेच महामार्ग चौपदरीकरण काम अपूर्ण असतानाही टोल वसुली कशी होऊ शकते. या टोलवसुलीला मनसे, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसनेही विरोध केला. जर टोलवसुली करण्याचा प्रयत्न केलाच तर तोडफोड, खळखट्याकचाही इशारा दिला होता. भाजपा आमदार नितेश राणेंनी तर एम.एच.०७ पासिंग गाड्यांना टोलमुक्ती मिळणार असे सांगितले होते. मात्र , आता प्रत्यक्षात पोलीस बंदोबस्तात ओसरगाव आणि हातीवले टोलनाक्यावर टोलवसुलीचे आदेश निघाल्याने नागरिकांच्या माथी लवकरच टोल वसुलीचे भूत बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.