आजपासून पुन्हा टोलवसुली होणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 06:09 AM2020-04-20T06:09:41+5:302020-04-20T06:10:01+5:30
सरकारने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन दरम्यान २९ मार्चपासून टोलवसुली थांबवली होती
मुंबई : २० एप्रिलपासून राज्यातील सर्व टोलनाक्यावर टोलवसुली सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या सचिवांनी जारी केले आहेत. राज्यभरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील सर्व टोलनाक्यांवर टोलवसुली सुरू होणार आहे.
सरकारने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन दरम्यान २९ मार्चपासून टोलवसुली थांबवली होती. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंची ने-आण करणे सोपे झाले होते. लॉकडाउनच्या काळात सर्व सेवा बंद होत्या. मात्र, आता देशभरात कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणी २० एप्रिलपासून सवलत मिळण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात काही अटी लागू करून उद्योगधंद्यांना परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आणि खासगी वाहने रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. यामुळे २० एप्रिलपासून सर्वांना प्रवास करताना टोल सुरू केला जाणार आहे.