राष्ट्रवादी नेत्यांना टोल फ्री क्रमांक देणार
By admin | Published: January 22, 2016 01:46 AM2016-01-22T01:46:40+5:302016-01-22T01:46:40+5:30
कोणतीही माहिती न घेता अर्धवट बोलणे हे राज्याच्या हिताचे नाही. तरीही राष्ट्रवादी काँगे्रसच्या बुद्धिवादी नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या हास्यास्पद विधानांसाठी
पुणे : कोणतीही माहिती न घेता अर्धवट बोलणे हे राज्याच्या हिताचे नाही. तरीही राष्ट्रवादी काँगे्रसच्या बुद्धिवादी नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या हास्यास्पद विधानांसाठी टोल फ्री नंबर सुरू करून देणार असल्याचा उपरोधिक टोला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला.
बाबा रामदेव यांना वनविभागाची जमीन देणार असल्याचा आरोप राष्ट्रवादी नेत्यांनी केला होता. पुण्यात एका कार्यक्रमानंतर मुनगंटीवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की वनविभागाची अशी जमीन देता येत नाही.
वनौषधी वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कंपन्यांशी चर्चा झाली आहे. त्यामध्ये रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीचाही समावेश आहे. राष्ट्रवादीचे नेते अर्धवट माहितीच्या आधारे आरोप करीत असतात. त्यांच्यासारख्या बुद्धिवान नेत्यांसाठी माझा मोबाईल कायम सुरू असला, तरी टोल फ्री नंबर सुरू करणार आहे. यासाठी पुढील अर्थसंकल्पात तरतूद करणार आहे, अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली.
टोलचा पैसा हा जनतेचा पैसा आहे. मागील सरकारने केलेल्या चुका दुरुस्त करायच्या आहेत. विकासाची गती वाढवायची आहे. जनतेवर बोजा पडणार नाही.
यासाठी टोलची आकडेवारी ठोसच असली पाहिजे, त्याचा परिणाम जनतेवर होता कामा नये. राज्य शासनाने अवैध बारा टोल रद्द केले. मात्र, ज्या टोल नाक्यांबाबत संदिग्धता आहे. अशा टोलचा मुख्यमंत्री व बांधकाममंत्री अभ्यास करीत आहेत. असे ७ ते ८ टोल आढळून आले आहेत. यामध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचाही समावेश आहे. त्यानंतर शासन आणि टोल चालवतात
यामध्ये काही तफावत तर नाही ना? हे पाहिले जाईल. विधी आणि न्याय मंडळाशी सल्लामसलत करून
निर्णय घेणार असल्याची त्यांनी स्पष्टोक्ती दिली.