खर्च वसुलीनंतरही टोलमध्ये वाढच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 02:16 AM2017-03-24T02:16:38+5:302017-03-24T02:16:38+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४वर अपेक्षित असलेला खर्च वसूल झाल्यानंतर टोल बंद करण्याऐवजी येत्या
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४वर अपेक्षित असलेला खर्च वसूल झाल्यानंतर टोल बंद करण्याऐवजी येत्या १ एप्रिलपासून त्यामध्ये वाढच होणार आहे़ सध्या मुंबई-पुणे प्रवासासाठी १९५ रुपये टोल द्यावा लागतो; त्याऐवजी यापुढे २३० रुपये मोजावे लागतील.
मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग बांधल्यानंतर त्याची देखभाल, दुरुस्ती व टोल वसूल करण्याचे अधिकार राज्य रस्ते विकास महामंडळाने आयआरबी कंपनीला दिले आहेत. त्यासाठी गुंतविलेली रक्कम, देखभाल दुरुस्तीसाठी येणारा खर्च व टोल वसुलीसाठी येणारा खर्च, गुंतविलेल्या रकमेवरील व्याज व या महामार्गावरून य-जा करणारी वाहने यांचा सर्व हिशोब करून २ हजार ८६९ कोटी रुपये वसूल करण्यासाठी कंपनीला ३१ मार्च २०१९पर्यंत टोल वसुलीचे अधिकार दिले आहेत़ प्रत्यक्षात वाहनांची संख्या व त्यात होणारी वाढ कमी गृहीत धरल्याने कंपनीला फेब्रुवारी २०१७पर्यंत ३ हजार ७ कोटी रुपये मिळाले आहेत़ मार्च २०१९पर्यंत हा टोल सुरू राहिला तर कंपनीला किमान ११०० कोटी रुपये अधिक मिळतील़ त्यामुळे हा टोल बंद करावा, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांकडून सुरू आहे़ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४वर १४६१ कोटी रुपये टोल अपेक्षित होता़ परंतु फेब्रुवारी २०१७पर्यंत १३८० कोटी रुपये वसूल झाले आहेत़. येत्या १ एप्रिलपासून या दोन्ही महामार्गांवरील टोलमध्ये वाढ होत आहे़ (प्रतिनिधी)
टोल बंद करावा यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आऱ एल़ मोपलवार यांना नोटीस दिली होती़ त्यामुळे यामध्ये त्यांचाही स्वार्थ असल्याचा संशय असून, तशी तक्रार १५ दिवसांपूर्वी आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली आहे़ पोलिसांनी कारवाई न केल्यास आम्ही हायकोर्टात जाणार आहोत. - विवेक वेलणकरअध्यक्ष, सजग नागरिक मंच