टोलच्या मुद्दय़ावरून राजदंड उचलला

By admin | Published: June 10, 2014 01:37 AM2014-06-10T01:37:54+5:302014-06-10T01:37:54+5:30

शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर आणि राजेश क्षीरसागर या दोन आमदारांना आज विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपेर्पयत उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी निलंबित केले.

Toll issue raised the scepter | टोलच्या मुद्दय़ावरून राजदंड उचलला

टोलच्या मुद्दय़ावरून राजदंड उचलला

Next

 मुंबई : कोल्हापूरमधील टोल बंद करा, अशी मागणी करत अध्यक्षांसमोरील राजदंड उचलल्यामुळे शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर आणि राजेश क्षीरसागर या दोन आमदारांना आज विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपेर्पयत उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी निलंबित केले. 

विधानसभेत आज दुपारी अर्थसंकल्पावरील चर्चेला प्रारंभ होत असतानाच क्षीरसागर आणि मिणचेकर सभागृहात आले आणि त्यांनी कोल्हापूरचा टोलप्रश्न उचलून धरला. टोलच्या नावाखाली कोल्हापूरकरांची लूट सुरू असून त्याविरोधात हजारो लोक आज रस्त्यावर उतरले आहेत. तेथील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सभागृहाचे कामकाज थांबवून या विषयावर चर्चा करावी आणि सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. 
शासनाने यापूर्वी सदर विषयावर निवेदन केले असल्याने पुन्हा चर्चा करता येत नाही. हा प्रश्न सरकारने गांभीर्याने घेतला आहे, असे उपाध्यक्ष पुरके म्हणाले. तथापि, त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांचे समाधान झाले नाही. मिणचेकर, क्षीरसागर आणि अन्य काही आमदारांच्या हातात टोलवर बंदी घाला, अशी मागणी करणारे फलकही होते. वेलमध्ये जाऊन त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. टोल बंद करण्याची मागणी त्यांनी लावून धरली.  (विशेष प्रतिनिधी)
 
15 मार्शलनी उचलून त्यांना बाहेर नेले 
क्षीरसागर आणि मिणचेकर अध्यक्षांच्या आसनाजवळ तावातावाने गेले. क्षीरसागर यांनी राजदंड उचलला. मिणचेकर त्यांच्यासोबत होते. यावर उपाध्यक्ष पुरके यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करत या दोघांनाही अधिवेशन संपेर्पयत निलंबित केल्याची घोषणा केली. दोन्ही आमदार सभागृहाबाहेर जात नाहीत हे पाहून 15 मार्शलनी उचलून त्यांना बाहेर नेले. 

Web Title: Toll issue raised the scepter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.