टोल वसुलीचे कंत्राट पुन्हा ‘आयआरबी’लाच!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 06:02 AM2020-02-13T06:02:21+5:302020-02-13T06:02:36+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग; एकाच कंपनीकडून निविदा दाखल
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या टोल वसुलीसाठी मागविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेदरम्यान केवळ ‘आयआरबी’ या कंपनीचीच निविदा दाखल झाली आहे. परिणामी, या द्रुतगती महामार्गाच्या टोल वसुलीचे कंत्राट पुन्हा एकदा ‘आयआरबी’ या कंपनीलाच मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
मुंबई-पुणे या द्रुतगती महामार्गावरील टोली वसुलीसाठी निविदा दाखल करण्याची मुदत १० फेब्रुवारी, २०२० रोजी संपली. मंगळवारी तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या. फेरनिविदा प्रक्रियेत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरचीच निविदा आल्याचे तांत्रिक निविदा छाननीत समोर आले. त्यामुळे मुंबई-पुण्याच्या टोल वसुलीचे कंत्राट ‘आयआरबी’ला मिळण्याची चिन्हे आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या टोल वसुलीचे काम ‘आयआरबी’कडे होते. त्याची मुदत आॅगस्ट, २०१९ साली संपली होती. त्यामुळे निविदा काढल्या. पहिल्या टप्प्यात निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे निविदा प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढीदरम्यान ‘आयआरबी’ची एकमेव निविदा आली. दरम्यान, निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ‘सहकार ग्लोबल कंपनी’कडे हंगामी स्वरूपात टोल वसुलीचे काम आहे.
मूल्यमापन सुरू; अंतिम निर्णयाची प्रतीक्षा
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या टोल वसुली कामासाठी निविदा प्रक्रियेत केवळ ‘आयआरबी इन्फ्रा’ची निविदा दाखल झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. या निविदा प्रक्रियेचे मूल्यमापन सुरू आहे. परिणामी, आम्हीदेखील अंतिम निर्णयाची वाट पाहत आहोत, असे आयआरबीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.