फक्त ‘एमएच०९’ला जूनपासून टोलमुक्ती
By admin | Published: May 19, 2015 12:43 AM2015-05-19T00:43:29+5:302015-05-19T00:47:42+5:30
अधिसूचना काढणार : चंद्रकांतदादांची माहिती; कृती समितीची आज बैठक
कोल्हापूर : शहरातील सर्व टोलनाके बंद करणे हेच राज्य सरकारचे धोरण आहे; परंतु कायदेशीर गोष्टींचा विचार करता त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे म्हणूनच या धोरणाचाच भाग म्हणून आम्ही १ जून पासून ‘एमएच ०९’ ही वाहने टोलमधून वगळणार आहोत. तशी अधिसूचनाही काढण्यात येणार आहे. मात्र, सरकार आपल्या ‘शब्दा’पासून मागे हटणार नाही, अशी स्पष्टोक्ती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलताना दिली.
दरम्यान, सरकारची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर यापुढे आपण कोणती भूमिका घ्यावी हे निश्चित करण्यासाठी कृती समितीची बैठक आज, मंगळवारी सायंकाळी होत आहे. पालकमंत्री पाटील यांनी सोमवारी दुपारी टोलविरोधी कृती समितीच्या काही निवडक कार्यकर्त्यांशी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि सरकारची भूमिका त्यांच्यासमोर मांडली. यावेळी प्रा. पाटील यांच्यासह निवासराव साळोखे, बाबा पार्टे, रामभाऊ चव्हाण,भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव, लालासाहेब गायकवाड, रमेश मोरे, अजित सासने, संभाजीराव जगदाळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील यांनी सरकारची भूमिका मांडताना सांगितले की, ‘कोल्हापूरला टोलमुक्त करणे हेच सरकारचे धोरण आहे. मात्र, अद्याप रस्त्यांचे मूल्यांकन झालेले नाही. आयआरबीला किती रक्कम द्यायची हे ठरलेले नाही. मूल्यांकन झाले तरी त्यावर एकमत होणे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी शेवटी लवादासमोर जाणार आहेत. म्हणूनच या सर्वांतून मार्ग निघायला आणखी सात-आठ महिन्यांचा कालावधी जाणार आहे म्हणूनच १ जूनपासून सरकार रीतसर अधिसूचना काढून कोल्हापूरच्या वाहनांना (एमएच ०९) टोलमधून वगळणार आहोत. कोल्हापूरची वाहने वगळल्यामुळे राज्य सरकारला प्रत्येक महिन्याला दोन-अडीच कोटी रुपये आयआरबी कंपनीला द्यावे लागतील. ही रक्कम संपूर्ण टोलमाफीपर्यंत सरकार देईल. ज्यावेळी एक विशिष्ट रक्कम देऊन आयआरबीला नारळ दिला जाईल त्यावेळी राज्य सरकार ती रक्कम महापालिकेला कर्जरूपाने देईल.’
कोल्हापूरच्या वाहनांना टोलमधून वगळल्यानंतर सरकार अंग काढून घेणार नाही. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जी रक्कम निश्चित होईल, ती देण्याची जबाबदारी सरकार घेणार आहे, सरकार मागे हटणार नाही. आम्ही जे आश्वासन दिले आहे ते पाळू, अशी नि:संदिग्ध ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
आज कृती समितीची बैठक
आज, मंगळवारी दुपारी साडेचार वाजता विठ्ठल मंदिरात ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. या बैठकीत सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे.
कोल्हापुरातील टोलसंदर्भात सोमवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली. यावेळी डावीकडून रमेश मोरे, निवासराव साळोखे, रामभाऊ चव्हाण, बाबा पार्टे, लालासाहेब गायकवाड, आदी उपस्थित होते.
..तर आंदोलनाला डाग लागेल
राज्य सरकार आयआरबीची रक्कम भागविणार असल्याने
१ जूनपासूनच टोलवसुलीला स्थगिती द्या, अशी विनंती कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांनी केली; परंतु तसे कायद्याने आपणास करता येणार नसल्याचा खुलासा पालकमंत्र्यांनी केला.
केवळ कोल्हापूरच्या वाहनांसाठी आम्ही आंदोलन सुरू केलेले नाही; तर आम्हाला संपूर्ण टोलमाफी हवी आहे आणि आता जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे आंदोलन थांबविले तर आमच्यावरील जनतेचा विश्वास उडेल, आंदोलनाला डाग लागेल, अशी भीतीही साळोखे यांनी व्यक्त केली. तेव्हा सर्वपक्षीय कृती समितीची बैठक बोलावून त्यांच्यासमोर सरकारची भूमिका सांगावी, अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी केली.
अन्य वाहनांचे काय..?
कोल्हापूर पासिंगच्या (एमएच-०९) वाहनांशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातीलच नागरिक परंतु इतर जिल्ह्यांतील पासिंगची वाहने वापरणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. त्यांना रोज नाक्यावर वाद घालत बसावे लागेल. आताही तसा वाद घालावा लागतो.
यासाठी कोल्हापूरचा रहिवासी असलेला परंतु कोणत्याही पासिंगची गाडी असल्यास त्याला रहिवासी दाखला देऊन टोलमधून सवलत देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.