मोर्चासाठी येणाऱ्या मनसेच्या वाहनांना टोलमाफ; राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 10:52 AM2020-02-09T10:52:03+5:302020-02-09T11:32:07+5:30
मनसे मोर्चासाठी येणाऱ्या पक्षाच्या गाड्या टोलनाक्यांवर मोफत सोडण्यात येत आहे.
मुंबई - पाकिस्तानी, बांग्लादेशी घुसखोरांना हाकला या मागणीसाठी मुंबईत मनसेने महामोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहे. पुणे, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते मोर्चासाठी उपस्थित राहणार आहे.
काही वर्षांपूर्वी मनसेकडून राज्यातील टोलनाक्यांवर आक्रमक आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्यांवर तोडफोड केली होती. मनसेच्या टोलविरोधी आंदोलनामुळे राज्यभरातील ६५ टोलनाके बंद झाल्याचा दावा पक्षाने केला होता. मात्र या आंदोलनाचे परिणाम आजही टोलनाक्यांवर दिसून येत आहे. मनसे मोर्चासाठी येणाऱ्या पक्षाच्या गाड्या टोलनाक्यांवर मोफत सोडण्यात येत आहे.
नाशिकहून मनसे कार्यकर्त्यांच्या गाड्या घोटी टोलनाक्यावरुन टोल न घेताच सोडल्या, तर पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांच्या गाड्याही पुणे-मुंबई एक्सप्रेस वे, खेड-शिवापूर टोल नाक्यांवर मोफत सोडण्यात आल्या. मुंबईतील या मोर्चासाठी लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत येतील असं पक्षाकडून सांगण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातून २८ ते ३० हजार, पश्चिम महाराष्ट्रातून २२ हजाराच्या आसपास कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत.
याबाबत मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष जगदीश वाल्हेकर यांनी राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहून कल्पना दिली होती. या पत्रात त्यांनी म्हटलं होतं की, मनसेच्या महामोर्चासाठी पुणे जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. त्यामुळे टोल नाक्यावर कोणताही वाद विवाद होऊ नये म्हणून या मार्गावरील टोलनाक्यावर मनसेच्या वाहनाकडून टोल वसूल करु नये, अशा सूचना संबंधित व्यवस्थापनाला देण्यात याव्यात अशी मागणी केली होती.
मनसेच्या मोर्चाचा मार्ग?
दुपारी 12 वाजता गिरगाव चौपाटी- हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरुवात होईल. स्वतः राज ठाकरे मोर्चात सामील असतील. सर्व कार्यकर्ते, मोर्चात सहभागी होणाऱ्या संघटना आणि सर्वसामान्य नागरिक मागे असतील. शामलदास गांधी मार्गावरुन हा मोर्चा पुढे जाईल. तिथून मेट्रो सिनेमा भागात मोर्चा पोहोचल्यानंतर राज ठाकरे आणि काही नेते महापालिका मार्गावरुन आझाद मैदानात आत जातील. मनसे कार्यकर्ते आणि मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्ती फॅशन स्ट्रीटच्या समोरील रस्त्यावरुन तीन गेटनी आझाद मैदानात आत जातील.
महत्त्वाच्या बातम्या
मनसेचा महामोर्चा : राज्यभरातून मनसैनिक हिंदू जिमखान्याच्या दिशेनं रवाना
'आज मनसेचा बुलंद आवाज मुंबईत घुमणार, या आणि सामील व्हा'
मनसेचा महामोर्चा भाजपा पुरस्कृत; शिवसेनेची राज ठाकरेंवर जहरी टीका
हिंदू जिमखाना ते आझाद मैदान... 'मनसे'चा महामोर्चा, पोलिसांची करडी नजर