गणेशोत्सवासाठी कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 07:05 AM2019-08-27T07:05:53+5:302019-08-27T07:06:05+5:30
गणेशोत्सवानिमित्त रस्ते वाहतुकीचा आढावा पाटील यांनी एका बैठकीत घेतला.
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई-कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाºया वाहनांना ३० आॅगस्ट ते १२ सप्टेंबरपर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली.
गणेशोत्सवानिमित्त रस्ते वाहतुकीचा आढावा पाटील यांनी एका बैठकीत घेतला. विनोद तावडे, आशिष शेलार, रवींद्र वायकर, दीपक केसरकर हे मंत्री तसेच आ. वैभव नाईक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाºया नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी रस्ते चांगले करण्यात आले आहेत. काही ठिकाणी किरकोळ कामे सुरू असून, ते तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचबरोबर अनेक भाविक मुंबई-कोल्हापूरमार्गे कोकणात जात असतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मुंबई-कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाºया वाहनांना टोल माफ करण्यात येईल.
पावसाने उघडीप दिल्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कामही जलदगतीने सुरू असून, जिथे रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.
तीर्थक्षेत्रांसाठी ७६ कोटी
श्रीक्षेत्र देहू-आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर व पालखीतळ मार्गावरील मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ४८ कोटी ९ लाख ९४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी २७ कोटी रुपयांचा निधी शासनाने वितरित केला आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.