टोलवसुली २०२७ पर्यंत राहणारच
By Admin | Published: December 12, 2015 02:57 AM2015-12-12T02:57:38+5:302015-12-12T02:57:38+5:30
मुंबई एन्ट्री पॉइंटवरील पाच टोलनाके टोलफ्री करण्याबाबत शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही
एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती : समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार
नागपूर : मुंबई एन्ट्री पॉइंटवरील पाच टोलनाके टोलफ्री करण्याबाबत शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच यासंबंधी पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
विधानसभा सदस्य संदीप नाईक, जयप्रकाश मुंदडा, सुनील प्रभू, सदा सरवणकर, पांडुरंग बरोरा, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, किसन कथोरे यांनी यांसदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले, की आॅगस्ट २०१५ अखेरपर्यंत एमईपी कंत्राटात झालेल्या वसुलीची रक्कम १,३६२.५९ कोटी असून, १६ वर्षांच्या ओएमटी कंत्राटात होणारी वसुली व खर्चाचा हिशेब पाहता १२.६० टक्के (आयआरआर) यायची शक्यता आहे.
शासन अधिसूचनेप्रमाणे मुंबईतील पाच प्रवेश पथकर नाक्यांवर २० सप्टेंबर २०२७ पर्यंत पथकर वसुली करावयाची आहे.
कंत्राट रद्द करणार नाही
सध्या सदर कंत्राट रद्द करण्याचे कोणतेही कायदेशीर कारण नाही. समितीचा निर्णय आल्यानंतरच त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी उत्तरात स्पष्ट केले.
- एकनाथ शिंदे,
सार्वजनिक बांधकाम मंत्री