गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी
By Admin | Published: August 23, 2016 05:30 PM2016-08-23T17:30:57+5:302016-08-23T17:30:57+5:30
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. गणपतीला कोकणात जाणाऱ्या वाहनांना सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. गणपतीला कोकणात जाणाऱ्या वाहनांना सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन वळवण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. आता कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणातील प्रमुख नेत्यांची आज मंत्रिमंडळासोबत बैठक झाली. या बैठकीत कोकणात जाणाऱ्या वाहनांवर आणि त्यांच्या सुरक्षेवर चर्चा केली.
गेल्या काही दिवसांमध्ये गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी देण्यात यावी, यासाठी मागणी केली जात होती. आता सरकारने यासंदर्भात निर्णय घेत कोकणात जाणाऱ्या गाड्यांना विशेष स्टिकर्स देण्याचं स्पष्ट केलं आहे.
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षेचा सरकार विचार करत आहे. गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. त्यामुळे ही वाहतूक मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरुन वळवण्यात आली आहे. कोकणात जाणाऱ्या या वाहनांना टोलमाफी दिली जाणार असून त्यांना विशेष स्टिकरच्या माध्यमातून ही सवलत दिली जाईल, असंही दीपक केसरकर यांनी सांगितलं.
देर आए दुरुस्त आए कोकणवासीयांना टोल माफीबाबत नितेश राणेंची प्रतिक्रिया
गणेशोत्सवात कोकणात जाणार्या भाविकांच्या वाहनांना मुंबई पुणे मार्गावर टोल माफी देण्याचा सरकारचा निर्णय यापूर्वीच घेण्याची गरज होती, मात्र कोकणवासीयांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याने सरकारचा हा निर्णय म्हणजे देर आए दुरुस्त आए असा असल्याची प्रतिक्रिया टोल माफीसाठी प्रयत्न करणार्या कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे .राणे या मागणीसंदर्भात अठरा ऑगस्टला मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना पत्र दिले होते. ही मागणी मान्य न झाल्यास स्वत: टोल नाक्यावर उभे राहून कोकणात जाणार्या गाड्या टोल शिवाय सोडण्याचे आंदोलन करण्याचा इशारा आमदार राणे यांनी दिला होता.