ग्राहकांना टोमॅटो चढ्या दराने; प्रत्यक्ष शेतकऱ्यांना किती भाव मिळतोय? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 02:30 PM2023-07-13T14:30:09+5:302023-07-13T14:45:01+5:30
महाराष्ट्रासह टोमॅटोच्या दरांनी शंभरी ओलांडली असताना, त्यातुलनेत प्रत्यक्ष टोमॅटो पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना निम्म्याहून कमी दर मिळताना दिसत आहे.
पुरेसे उत्पादन नसल्याने टोमॅटोचे बाजारातील भाव चढेच असून ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक घेतले आहे, त्यांनाही या बाजारभावामुळे फायदा होताना दिसतो आहे. मात्र अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना किलोमागे केवळ १० रुपये, २५ रुपये किंवा ३० रुपये किमान दर मिळत असून सरासरी ५० ते ६० रुपये दर मिळत आहे.
आज दिनांक १३ रोजी सकाळी राज्याच्या विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक घटलेलीच दिसून आली. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाने प्रसिद्ध केलेल्या बाजारभावांच्या माहितीनुसार आज सकाळी गुलटेकडी पुणे येथे टोमॅटोच्या लोकल व्हरायटीची इतर बाजारसमित्यांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे १३७२ क्विंटल आवक झाली. त्यामुळे इथे किमान दर ३ हजार प्रती क्विंटल तर कमाल दर ९ हजार रुपये प्रती क्विंटल असा होता. तर सरासरी दर ६ हजार रुपये प्रती क्विंटल इतका होता.
आज कल्याण बाजार समितीत हायब्रीड व्हरायटीच्या ३ क्विंटल टोमॅटोची आवक झाल्याने तेथील किमान दर १५ हजार रुपये, कमाल दर १७ हजार रुपये तर सरासरी दर १६ हजार रुपये प्रती क्विंटल इतके होते. त्याखालोखाल दर पेणमध्ये मिळाले. येथे लोकल व्हरायटीचे ८४ क्विंटल टोमॅटोची आवक झाली. त्यासाठी किमान १० हजार, कमाल १२ हजार, तर सरासरी १० हजार रुपये प्रती क्विंटल असा दर होता.
आज सर्वात कमी दर राहुरी येथे मिळाला. येथे टोमॅटोची तुलनेने कमी म्हणजेच २६ क्विंटल आवक होऊनही दर मात्र किमान एक हजार, कमाल ५ हजार आणि सरासरी ३ हजार रुपये मिळाले. म्हणजेच शेतकऱ्यांना एका किलोसाठी केवळ १० रुपये आणि सरासरी ३० रुपये मिळाले.
दरम्यान नागपूर आणि पनवेल येथे चांगली आवक झाली असून दरही क्विंटलमागे सरासरी दहा हजार व आठ हजार असे अनुक्रमे राहिले.