पेट्रोलपेक्षा टोमॅटो महाग
By admin | Published: July 10, 2017 06:02 AM2017-07-10T06:02:57+5:302017-07-10T06:02:57+5:30
महिन्यापूर्वी २० ते ३० रुपयांत मिळणाऱ्या टोमॅटोचे भाव आता ८० ते १०० रुपयांवर पोहोचले
मुंबई/ नागपूर : महिन्यापूर्वी २० ते ३० रुपयांत मिळणाऱ्या टोमॅटोचे भाव आता ८० ते १०० रुपयांवर पोहोचले असून स्वयंपाकघरातून टोमॅटो गायब झाले आहेत. शंभरी गाठल्यामुळे आता टोमॅटो पेट्रोलपेक्षा महाग असल्याची सर्वत्र चर्चा आहे.
>दुप्पट भावाने विक्री
सध्या नारायणगाव, मदनफल्ली (आंध्र प्रदेश) आणि नाशिक येथून टोमॅटोची आवक आहे. नागपूर बाजार समितीत ५० ते ६० रुपये घाऊक भाव असला तरी किरकोळ विक्रेते दुपटीने विक्री करीत आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज जवळपास ५५० ते ६०० वाहनांमधून भाजीपाला विक्रीसाठी येत असतो; परंतु मागील काही दिवसांपासून आवक कमी झाली असून, सरासरी ४०० ते ५०० वाहनांचीच आवक होत आहे. मुंबई, नवी मुंबईकरांसाठी रोज ७०० ते ८०० टन टोमॅटोची गरज असते; परंतु सद्य:स्थितीमध्ये जेमतेम २०० ते ३०० टनच आवक होऊ लागली आहे. परिणामी, बाजारभाव प्रचंड वाढले आहेत. १ जुलैला ६ ते १४ रुपये किलो दराने टोमॅटो विकला जात होता. तुटवडा निर्माण झाल्यामुळे हे दर तब्बल २० ते ५० रुपये किलो झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ७० ते १०० रुपये किलो झाले आहेत. एक महिन्यापूर्वी फ्लॉवरची सरासरी १५० ते १७० टन आवक होऊ लागली होती. यामुळे फ्लॉवर फेकून देण्याची वेळ आली होती. १ जुलैला होलसेलमध्ये ५ ते ९ रुपये फ्लॉवरचे दर होते ते आता १५ ते २० रुपयांवर गेले असून, किरकोळ मार्केटमध्ये हे दर ६० रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत.
>कोथिंबीरचे ‘दुहेरी शतक’ : गावरानी कोथिंबीरचे भाव १६० ते १८० रुपये किलो आहे. किरकोळमध्ये २५० रुपये किलोपर्यंत विक्री सुरू आहे. उन्हाळ्यात लागवड केलेला माल संपत आल्यामुळे व नवीन पीक आले नसल्याने, राज्यभर भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्येही आवक कमी होऊ लागली असून, बाजारभाव प्रचंड वाढले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये अनेक भाज्यांचे दर वाढल्याने किचनचे बजेट दुप्पट झाले आहे.