उद्या राज्यभरात निवासी डॉक्टरांचा ‘मास बंक’
By admin | Published: March 16, 2017 04:06 AM2017-03-16T04:06:32+5:302017-03-16T04:06:32+5:30
धुळ््यातील जिल्हा रुग्णालयात निवासी डॉक्टराला झालेल्या मारहाणप्रकरणी राज्यभरातील साडेचार हजार निवासी डॉक्टर शुक्रवार, १७ मार्चला एक दिवसाच्या
मुंबई : धुळ््यातील जिल्हा रुग्णालयात निवासी डॉक्टराला झालेल्या मारहाणप्रकरणी राज्यभरातील साडेचार हजार निवासी डॉक्टर शुक्रवार, १७ मार्चला एक दिवसाच्या मास बंक करणार आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही निवासी डॉक्टरांवर जीवघेणे हल्ले होत असल्याचा निषेधार्थ हा मास बंक पुकारण्यात आल्याचे मार्ड संघटनेतर्फे सांगण्यात आले.
त्याचबरोबर आयएमएदेखील याच दिवशी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहे.
गेल्या दोन वर्षांत डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या ४५ घटना घडल्या आहेत. या घटनांची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली, पण एकही प्रकरण निकाली लागलेले नाही.
या तक्रारींचा निकाल लावून डॉक्टरांना न्याय मिळवून द्यावा, अशी महत्त्वाची मागणी आहे. निवासी डॉक्टरांना क्षयरोग आणि प्रसूती रजा मिळावी. याविषयी आश्वासन देण्यात आले आहे, पण याची योग्य त्या पद्धतीने अंमलबजावणी व्हावी. हॉस्टेलमध्ये सुधारणा करण्यात यावी. फ्री-शिपचा प्रश्न सोडवावा, तक्रार निवारण कक्षाची स्थापना करावी, निवासी डॉक्टरांसाठी विमा योजना तयार करण्यात यावी, या मागण्या आहेत.
सरकारने याकडे लक्ष द्यावे आणि मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी असल्याचे मार्डचे सचिव डॉ. स्वप्निल मेश्राम यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)