उद्यापासून पूरग्रस्तांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा होतील; विजय वडेट्टीवार यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 01:03 PM2021-07-29T13:03:23+5:302021-07-29T13:15:04+5:30
emergency relief: पावसामुळे 4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज
नागपूर: काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं. या नुकसानग्रस्तांना तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधकांकडून होत होती. यातच आता सरकारने या नुकसानग्रस्तांना 10 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. उद्यापासून 10 हजाराची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
माध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. रोख रकमेचं वाटप केलं तर पैशाचं वाटप बरोबर झालं नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. त्यामुळे उद्यापासूनच त्यांच्या थेट खात्यात हे पैसे जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच, प्रशासनाला तातडीने पंचनामे करून आठ दिवसात अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही ते म्हणाले. याशिवाय, पावसामुळे 4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचंही ते म्हणाले. काही ठिकाणी तर 400 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयनाच्या परिसरात 48 तासात 1072 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि 17 टीएमसी पाणी साठ्याची वाढ झाली. निसर्गाचं बॅलन्स बिघडल्याची ही परिस्थिती आहे. म्हणून अनेक समित्यांचा अभ्यास करावा लागेल, असंही ते म्हणाले.
लोकांमध्ये गैरसमज झाला
यावेळी विजय वड्डेटीवार यांनी केंद्राकडून मिळालेल्या मदतीवरही भाष्य केलं. केंद्र सरकारने 700 कोटी रुपये दिले, पण ते गेल्यावर्षी आलेल्या ऑक्टोबरच्या पुराचे आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. बघा पूर आला आणि पैसे दिले, असा गैरसमज लोकांमध्ये पसरला आहे. आम्ही 3721 कोटींचा प्रस्ताव पाठवला होता. आता त्यातले 700 कोटी मिळाले. तौक्ते, निसर्ग वादळ आलं, विदर्भात महापूर झाला त्याचीही अजून मदत मिळाली नाही. या सर्व संकटात 420 आणि 721 कोटी राज्याला मदत मिळाली आहे. म्हणजे राज्याला आतापर्यंत 1141 कोटी आतापर्यंत मिळाले आहेत. पुढचे पैसे मिळावेत ही अपेक्षा, असंही ते म्हणाले.