हरकतींवर उद्या सुनावणी
By Admin | Published: November 3, 2016 12:32 AM2016-11-03T00:32:39+5:302016-11-03T00:32:39+5:30
४ सदस्यीय प्रारूप प्रभागरचनेबाबत नागरिकांनी नोंदविलेल्या हरकतींवर शुक्रवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेतली जाणार आहे.
पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या ४ सदस्यीय प्रारूप प्रभागरचनेबाबत नागरिकांनी नोंदविलेल्या हरकतींवर शुक्रवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेतली जाणार आहे. या सुनावणीसाठी राज्य निवडणूक आयोगाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांना प्राधिकृत केले आहे.
बालगंधर्व रंगमंदिर येथे ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रभागनिहाय ही सुनावणी घेतली जाणार आहे. प्रारूप प्रभागरचनेवर ४१ प्रभागांमधून ११०० हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. त्या सर्व हरकतदारांना सुनावणीसाठी कार्यक्रमाची वेळ व ठिकाण पत्राने कळविण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक १ ते १० बाबत घेण्यात आलेल्या हरकतींवर सकाळी ११ ते ११.३० या वेळेत सुनावणी
घेतली जाणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० ते २.३० या वेळेत प्रभाग क्रमांक ११ ते २०च्या हरकतींवर सुनावणी होईल. त्यानंतर दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत प्रभाग क्रमांक २१ ते ३० च्या हरकतींवर सुनावणी होणार आहे. प्रभाग क्रमांक ३१ ते ४१ च्या हरकतींवर दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता सर्वसाधारण हरकतींवर सुनावणी होणार आहे.
महापालिकेच्या निवडणूक विभागाने ७ आॅक्टोबर रोजी प्रारूप प्रभागरचना जाहीर केली. महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच ४ सदस्यांचा एक प्रभाग यानुसार पार पडणार आहे. प्रभागरचना तयार करताना भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्याप्रमाणात हस्तक्षेप केला असून, प्रभागांची मोठ्याप्रमाणात मोडतोड करण्यात आल्याची टीका राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती. प्रभागरचनेवर हरकती नोंदविण्यास सुरुवातीच्या टप्प्यात खूपच कमी प्रतिसाद मिळाला होता. सुरुवातीच्या १४ दिवसांमध्ये प्रभागरचनेवर ४०० हरकती नोंदविल्या गेल्या. शेवटच्या दिवशी मात्र एका दिवसात ७०० हरकती प्रशासनाकडे आल्या, त्यानंतर एकूण हरकतींची संख्या ११०० वर पोहोचली आहे.
प्रशासनाला या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यास त्या अभिप्रायांसह ही हरकत निवडणूक आयोगाकडे पाठविली जाणार आहे. या हरकतींशी प्रशासन सहमत नसल्यास त्याबाबतचा अभिप्राय हरकतींवर नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रभागरचनेमध्ये बदल करण्याचा अंतिम निर्णय निवडणूक आयोगाकडून घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)
>वेळेवर हजर न राहिल्यास निकाली
प्रभागरचनेच्या सुनावणीसाठी निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार संबंधित हरकतदारांनी वेळेवर हजर न राहिल्यास किंवा अनुपस्थित राहिल्यास त्यांची हरकत लगेच निकाली काढली जाणार आहे. त्यावर पुन्हा सुनावणी घेणे शक्य होणार नाही, असे महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
>सुनावणीसाठी बोलावलेच नसल्याची तक्रार
प्रारूप प्रभागरचनेवर हरकत नोंदविलेल्यांना वैयक्तिक पत्र पाठवून हरकतीचा दिनांक, वेळ व ठिकाण कळविले असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले असले, तरी बहुसंख्य हरकतदारांना याबाबतचे निमंत्रण मिळाले नसल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांच्यासह अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना हरकतीसाठी निमंत्रण मिळाले नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.