द. भि. कुलकर्णी यांचे पुण्यात निधन

By Admin | Published: January 28, 2016 03:47 AM2016-01-28T03:47:30+5:302016-01-28T03:47:30+5:30

ज्येष्ठ समीक्षक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. दत्तात्रय भिकाजी तथा द. भि. कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने बुधवारी खासगी रुग्णालयात निधन झाले.

The Too Kulkarni dies in Pune | द. भि. कुलकर्णी यांचे पुण्यात निधन

द. भि. कुलकर्णी यांचे पुण्यात निधन

googlenewsNext

पुणे : ज्येष्ठ समीक्षक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. दत्तात्रय भिकाजी तथा द. भि. कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने बुधवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.
‘द.भिं.’च्या रूपाने साहित्य समीक्षा पोरकी झाल्याचे मत साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे. ते बदलापूरच्या स्वायत्त विद्यापीठाचे कुलगुरू होते. आजारी असतानाही त्यांचे कार्य अखेरपर्यंत सुरू होते. सुमारे २५ दिवाळी अंकांचे काम त्यांनी हाती घेतले होते. पुण्यातील ८३ व्या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
डॉ. कुलकर्णी यांनी १९६८ मध्ये नागपूर विद्यापीठातून पीएच.डी मिळवली. विदर्भ साहित्य संघाची साहित्य वाचस्पती ही पदवीही त्यांना मिळाली होती. नागपूर, पुणे व उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत त्यांच्या अनेक ग्रंथांचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश झाला आहे. समीक्षाग्रंथांतून द. भिं.च्या वाङ्मयीन विचारांची व्यापकता लक्षात येते. प्राचीन आणि अर्वाचीन या दोन्ही साहित्य परंपरांचा त्यांचा व्यासंग होता. पाश्चात्य समीक्षेपेक्षा कुलकर्णी यांनी पौर्वात्य, संस्कृत, साहित्यशास्त्र परंपरेची भूमिका नेहमीच ग्राह्य मानली. त्यांची समीक्षा पूर्वसूरींच्या समीक्षेचा परामर्श घेत मर्मदृष्टीने कलाकृतींचा नव्याने वेध घेणारी, अभिजात रसिकतेची साक्ष पटवणारी आहे. (प्रतिनिधी)

साहित्य समीक्षा : पहिली परंपरा, चार शोधनिबंध, युगास्त्र, दुसरी परंपरा, हिमवंतीची सरोवरे, ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद, महाकाव्य : स्वरूप व समीक्षा (प्रबंध), मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र, अनन्यता मर्ढेकरांची, देवदास आणि कोसला, चौदावे रत्न, पहिल्यांदा रणांगण, अपार्थिवाचे चांदणे, समीक्षेची वल्कले, स्फटिकगृहाचे दीप. कथासंग्रह : रेक्वियम, ललित लेखन : मेघ, मोर आणि मैथिली.

शैक्षणिक व वाङमयीन सन्मान : विदर्भ साहित्य संघ, नागपूर संस्थेतर्फे डी.लिट. समकक्ष पदवी, साहित्य वाचस्पती (१९८३), अखिल भारतीय मराठी उद्बोधन वर्गाचे प्रवर्तक (१९८८), महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (१९९१), मंगेशकर वाग्विलासिनी पुरस्कार, समीक्षाग्रंथांसाठी सरकारचा उत्कृष्ट वाङमय पुरस्कार, ‘कादंबरी : स्वरूप व समीक्षा’ ग्रंथास साहित्य परिषदेचा श्रेष्ठता ग्रंथ पुरस्कार, पु. भा. भावे पुरस्कार (२००७), अमृतमहोत्सवी सत्कार (२००८)

साहित्यिक द. भि. कुलकर्णी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने साहित्य समीक्षा पोरकी झाल्याचे मत साहित्य वर्तुळातून व्यक्त झाले

ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्याचे गाढे अभ्यासक द. भि. कुलकर्णी यांच्या निधनाने समीक्षा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. एक अभ्यासू समीक्षकच नव्हे, तर साहित्याचा एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

कुलकर्णी हे सूक्ष्म कलात्मक आणि कलावादी समीक्षा लिहिणारे विद्वान समीक्षक होते. साहित्य विश्वात त्यांच्या समीक्षेने मानदंड प्रस्थापित केले, अशा शब्दांत साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

मराठी साहित्यातील समीक्षेला द. भि. कुलकर्णी यांनी नवा आयाम दिला. केवळ समीक्षाच नव्हे, तर त्यांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारे लिखाण त्यांनी केले. त्यांचे ग्रंथ अभ्यासकांना सदैव मार्गदर्शक ठरतील. ‘ज्ञानेश्वरी’ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा आणि अध्यापनाचा विषय होता. त्यांच्या निधनाने एक महत्त्वाचा साक्षेपी लेखक-समीक्षक गमावला आहे.
- देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)

द.भिंच्या समीक्षणामुळे अनेक लेखक खऱ्या अर्थाने समाजासमोर आले. विद्यार्थ्यांचे शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे, यासाठी ते आग्रही होते.
- विनोद तावडे, सांस्कृतिकमंत्री

डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या निधनाने एक विद्वान आणि व्यासंगी समीक्षक हरपला आहे. विदर्भातच त्यांची कारकीर्द घडली. साहित्य विश्वासाठी त्यांचे योगदान मोठे होते. दभिंचा ‘लोकमत’ परिवाराशी गाढ स्नेह होता. काही वर्षांपूर्वी ते ‘लोकमत’चे अतिथी संपादक म्हणून दिवसभर कार्यालयात होते. लोकमत साहित्य पुरस्काराच्या पहिल्या समारंभाला अतिथी म्हणूनही ते आले होते. ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे त्यांनी भरभरून कौतुक केले होते. नुकतेच त्यांच्या हस्ते ‘लोकमत’च्या ‘दीपोत्सव’या दिवाळी अंकाचे प्रकाशनही करण्यात आले होते. वाचनीय आणि दर्जेदार गोष्टींचे ते कौतुक तर करीतच पण हक्काने काही सूचनाही करायचे. द. भि. यांच्या निधनाने साहित्य समीक्षा पोरकी झाली आहे.
- खासदार विजय दर्डा, चेअरमन, लोकमत मीडिया प्रा.लि.

ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक द. भि. कुलकर्णी यांचे निधन धक्का देणारे आहे. यंदाचे ८९ वे संमेलन त्यांचे अखेरचे संमेलन ठरेल, असे कुणालाच वाटले नाही. साहित्य क्षेत्रातील मोठी व्यक्ती हरपली असून, त्यांची कसर भरून निघणे अशक्य आहे.
-पी. डी. पाटील, विद्यमान स्वागताध्यक्ष, पिंपरी साहित्य संमेलन

द.भि. कुलकर्णी यांच्या रूपाने मराठी समीक्षेतील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड गेले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. समीक्षेतील ज्ञानेश्वर पूर्व काळातील संस्कृत साहित्य, ज्ञानेश्वर काळातील साहित्य आणि आधुनिक साहित्य या समीक्षांच्या तिन्ही टप्प्यावर त्यांचे प्रभुत्व होते.
- डॉ. सदानंद मोरे, माजी संमेलनाध्यक्ष

द. भि. यांची समीक्षा ही सर्जनशीलतेचे नवीन मानदंड प्रस्थापित करणारी होती. मर्ढेकर, सुरेश प्रभू आणि कवी ग्रेस या कवींना द.भिंच्या समीक्षेमुळे नाव मिळाले.
-डॉ. माधवी वैद्य, कार्याध्यक्ष, मसाप

५० वर्षे समीक्षा करणारे द. भि. कुलकर्णी परिपूर्ण लेखक आणि समीक्षक होते. त्यांनी केलेले लिखाण हे अभ्यासपूर्ण आहे. पाश्चात्य साहित्यशास्त्राचा प्रभाव असतानादेखील त्यांनी भारतीय शास्त्रकलेच्या संकल्पना जागविल्या. त्यांच्या जाण्याने दु:ख झाले आहे.
- वसंत डहाके (ज्येष्ठ साहित्यिक)

लक्ष्मीचा सण नाही, तर सरस्वतीचा खेळ झाला पाहिजे, असे कुलकर्णी नेहमी म्हणत. मराठी साहित्याच्या प्रसार- प्रचारासाठी ते सदैव तत्पर असत. त्यांचे समीक्षेवर प्रभुत्व होते. त्यामुळेच वाचकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवले.
- सतीश देसाई (ज्येष्ठ साहित्यिक)

द. भि. यांच्या समीक्षा या साचेबद्ध चौकटीत कधीच राहिल्या नाहीत. कवितेवरील त्यांची समीक्षा वाखाणण्याजोगी असे. त्यांच्या जाण्याने साहित्यक्षेत्रात कधीही भरून न निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे.
- पुष्पा भावे (ज्येष्ठ साहित्यिक)

Web Title: The Too Kulkarni dies in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.